Eknath Shinde vs Uddhav Thackeray Live: ठाकरे सरकारने वर्षभर विधानसभा अध्यक्षांची निवड केली नाही, शिंदेगटाचा कोर्टात युक्तीवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 11:09 AM2022-08-03T11:09:52+5:302022-08-03T13:23:36+5:30
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: आजच्या सुप्रीम सुनावणीवरच शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरणार आहे.
मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर सर्वोच्च न्यायालयात ५ वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. तर, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही याच निर्णयामुळे लांबल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे, आजच्या सुप्रीम सुनावणीवरच शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य ठरणार आहे.
विधानसभेच्या उपाध्यक्षांनी आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली आणि उत्तर देण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली. त्याविरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात गेला आहे. त्यानंतर कोर्टाने ११ जुलैपर्यंत ही सुनावणी पुढे ढकलली होती. मात्र दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे प्रकरण घटनापीठाकडे देण्यात यावं असं मत मागील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने मांडले होते.
- आजच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट ५ किंवा त्याहून जास्त न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन करू शकतं असं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं.
- न्यायालयात न्या. रमण्णा यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून अभिषेक मनु संंघवी, राजू धवन, कपिल सिब्बल हे वकील युक्तीवाद करत आहेत.
- तुुम्ही शिवसेना पक्ष हा तुमचा असल्याचा दावा करु शकत नाहीत. गुवाहटीत बसून तुम्हाला शिवसेना पक्ष ठरवता येणार नाही. निवडणूक आयोग पक्ष ठरवत असते, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.
- राज्यघटनेतील 10 व्या सूचीनुसार कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद होत आहे. बहुमत असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे, पण कोणत्याही प्रकारची फूट ही 10 व्या सूचीचं उल्लंघन असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं आहे.
- अधिवेशन, सरकार स्थापनेची प्रक्रिया अवैध तर सरकारने घेतलेले सर्व निर्णयही अवैध असल्याचेही सिब्बल यांनी म्हटलं आहे.
- बंडखोरांना इतर कुठल्यातरी पक्षात विलिन व्हावं लागेल, 10 व्या सूचीनुसार हाच पर्याय बंडखोर गटाला असल्याचं अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं आहे.
शिंदे गटाकडून हरिश साळवे यांचा युक्तीवाद
- मुख्यमंत्री भेटत नसतील तर नेता बदलण्याचा अधिकार आहे, नेता म्हणजे राजकीय पक्ष असाच आपल्या देशात समज - हरिश साळवे
- बंडखोर हे पक्षातच आहेत, बंडखोर म्हणजे वेगळी मतं असलेले पक्षातील नेते - साळवे
- पक्षात फूट पडली असेल तर पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही, पक्ष सोडला असेल तरच पक्षांतरबंदी कायदा लागू होतो - साळवे
- निवडणूक आयोगापुढील प्रकरण आणि कोर्टातील याचिकांचा परस्पर संबंध नाही - साळवे
- बंडखोर आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने आम्ही उच्च न्यायालयात न जाता थेट सुप्रीम कोर्टात आलो - नीरज कौल
- शिंदे गटाचे वकील जो युक्तीवाद होत आहे, त्यातून अर्थबोध होत नाही. त्यामुळे, न्यायाधीशांनी साळवे यांना लिखित स्वरुपात उद्या युक्तीवाद दिला तरी चालेल, असे म्हटले. मात्र, आम्ही आजच लिखित युक्तीवाद देऊ, असे साळवे यांनी सांगितले.
- ठाकरे सरकारने वर्षभरात विधानसभा अध्यक्ष निवडला नव्हता, नवीन सरकारने तात्काळ अध्यक्ष निवडीची प्रक्रिया केली- महेश जेठमलानी
- आजची सुनावणी संपली, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आता उद्या म्हणजे 4 ऑगस्ट रोजी प्राधान्याने सुनावणीला सुरुवात होणार