एकनाथ शिंदेंचा दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते होणार सन्मान; ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 09:21 IST2025-02-11T09:21:18+5:302025-02-11T09:21:56+5:30
५ लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

एकनाथ शिंदेंचा दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते होणार सन्मान; ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार जाहीर
Shiv Sena Eknath Shinde: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदे यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनात ११ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान समारंभ होईल. ५ लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे. केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आणि पद्मभूषण राम सुतार यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
दरम्यान, कार्यक्रमाच्या पूर्वी शमिमा अख्तर यांच्या अभंग गायनाचा तसेच मराठी गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे.