Biparjoy Cyclone : एकदा दोनदा नव्हे तर 'या' वृद्ध जोडप्याने चक्रीवादळात तीनदा गमावलं घर; बिपरजॉयवर म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 10:21 AM2023-06-16T10:21:49+5:302023-06-16T10:34:10+5:30
Biparjoy Cyclone : चक्रीवादळामुळे एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीनदा आपलं घर उद्ध्वस्त होताना पाहिलं आहे.
चक्रीवादळ बिपरजॉयची लँडफॉल प्रक्रिया सुरू झाली आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर सुमारे 125 किमी प्रति तास वेगाने जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गुजरातच्या ज्या भागात हे चक्रीवादळ सागरी किनार्यावर धडकत आहे, तिथे एक वृद्ध जोडपं राहतं ज्यांनी चक्रीवादळामुळे एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीनदा आपलं घर उद्ध्वस्त होताना पाहिलं आहे.
गुजरातमधील जाखाऊ येथील एका जोडप्याने अनेक वेळा त्यांचं घर पुन्हा बांधलं आहे. हवाबाई आणि उस्मान, दोघेही 70 वर्षांचे आहेत. ते सध्या जखाऊ जवळील निवारागृहात आहेत ज्यांना किनार्याजवळच्या भागातून बाहेर काढण्यात आले आहे. उस्मान म्हणाले, "आमच्याकडे पक्कं घर नसल्यामुळे, आम्ही यापूर्वी चक्रीवादळात आमचं घर कोसळताना आणि उडताना पाहिलं आहे."
या दाम्पत्याचा उदरनिर्वाह शेतीतून होतो. त्यांनी सांगितले की, प्रत्येक वेळी त्यांच्या कमाईने आणि मुलांच्या मदतीने त्यांनी घर पुन्हा बांधलं. मात्र, अतिवृष्टीचा परिणाम आपल्या पिकांवर झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आज पुन्हा घर कोसळण्याच्या शक्यतेबद्दल त्यांना काळजी वाटते का, असं विचारलं असता, या जोडप्याने सांगितलं की, ते मजूर म्हणून काम करतील आणि घर पुन्हा बांधण्यासाठी पैसे गोळा करतील.
भूतकाळात दिसलेल्या तीन चक्रीवादळांपेक्षा बिपरजॉय हे भयंकर होईल अशी भीती वाटत आहे का, असे विचारलं. तर त्यावर त्यांनी आपण घाबरत नसल्याचं सांगितलं. उस्मान म्हणाले, "चक्रीवादळाचा आपल्यावर फारसा परिणाम होणार नाही. हेही निघून जाईल. आम्ही भाग्यवान आहोत की लोकांनी आपली घरे गमावली असली तरी, यापूर्वी या प्रदेशात कोणतीही जीवितहानी झालेली नाही."
बिपरजॉय चक्रीवादळ हे जोडपे राहत असलेल्या जखाऊ जवळच्या भागात किनारपट्टीवर धडकणार आहे. कच्छ, जामनगर, मोरबी, राजकोट, देवभूमी द्वारका, जुनागढ, पोरबंदर आणि गीर सोमनाथ या आठ किनारी जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांना तात्पुरत्या आश्रयस्थानी नेण्यात आल्याचं सरकारने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.