अंधारात टॉर्च घेऊन ते धावले...; वृद्ध दाम्पत्यामुळे टळला रेल्वे अपघात, वाचला हजारो लोकांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 01:31 PM2024-02-27T13:31:53+5:302024-02-27T13:38:46+5:30
वृद्ध दाम्पत्य तातडीने रेल्वे ट्रॅकवर पोहोचले आणि अपघात होण्यापासून थांबवला. यामुळे शेकडो लोकांचा जीव वाचला आहे.
तामिळनाडूतील एका वृद्ध दाम्पत्याच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा रेल्वेअपघात टळला आहे. भगवतीपुरम ते आर्यनकावू रेल्वे ट्रॅकवरील क्रॅश बॅरियरला धडकल्यानंतर ट्रक खाली पडला. काही वेळाने ट्रेन ट्रॅकवरून जाऊ लागते आणि याच दरम्यान शनमुगैया आणि कुरुनथम्मल यांनी ते पाहिलं. त्यानंतर दोघांनी ट्रॅकवरून धावत जाऊन टॉर्च दाखवत ट्रेन थांबवली.
द हिंदूने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, केरळहून प्लायवूड घेऊन जाणारा ट्रक तामिळनाडूतील थूथुकुडीला जात होता, मात्र वाटेत अचानक 12.50 वाजता तो रेल्वे ट्रकच्या वरून जाणाऱ्या रस्त्यावरून खाली पडला. हे पाहून वृद्ध दाम्पत्य तातडीने रेल्वे ट्रॅकवर पोहोचले आणि अपघात होण्यापासून थांबवला. यामुळे हजारो लोकांचा जीव वाचला आहे. या कारणामुळे लोक या वृद्ध जोडप्याचं खूप कौतुक करत आहेत.
'द हिंदू'शी बोलताना अधिकाऱ्याने सांगितलं की, ट्रेन 30 किलोमीटर प्रतितास वेगाने धावत होती. वृद्ध जोडप्याने आम्हाला इशारा केल्यावर आम्ही ट्रेन थांबवण्यात यशस्वी झालो. अपघातामुळे चेन्नई-एग्मोर कोल्लम एक्स्प्रेसला दोन तासांपेक्षा जास्त उशीर झाला.
हा अपघात अशा वेळी उघडकीस आला आहे जेव्हा रविवारी डिझेल इंजिनवर धावणारी मालगाडी जम्मू-काश्मीरमधील कठुआपासून पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यातील एका गावात चालक नसताना 70 किलोमीटरहून अधिक अंतर प्रवास करत होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी 7:25 ते 9 च्या दरम्यान घडली, परंतु या काळात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.