आजारी पत्नीसाठी वृद्ध पतीची धडपड, हातगाडीवरुन रुग्णालयात नेलं; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 12:11 PM2022-04-05T12:11:27+5:302022-04-05T12:12:27+5:30
शुकूल यांच्या आजारी पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन न मिळाल्याने त्यांनी हातगाडीवरुन पत्नीला चिलकहर येथील सरकारी रुग्णालयात नेले.
बलिया - कोरोनाचा दोन वर्षांचा भयावह काळ आपण सर्वांनीच अनुभवला. रुग्णलयांकडून होणारी रुग्णांची हेळसांड, वाढीव बिलं आणि कोलमडलेली यंत्रणा दिसून आली. त्यातच, गरीबांचे मोठे हाल झाल्याचं पाहायाला मिळालं. मात्र, देशातील अनेक भागात आरोग्य यंत्रणांची कोलमडलेली परिस्थिती आजही दिसून येते. चिलकहर ब्लॉकच्या अंदौर येथील रहिवाशी शुकूल राजभर यांना आपल्या पत्नीला चक्क हातगाडीवर रुग्णालयात न्यावे लागले.
शुकूल यांच्या आजारी पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन न मिळाल्याने त्यांनी हातगाडीवरुन पत्नीला चिलकहर येथील सरकारी रुग्णालयात नेले. 28 मार्च रोजीही ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राजभर यांनी चिलकहर येथून पुन्हा जिल्हा रुग्णालयात पत्नीला दाखल केले. मात्र, दुर्दैवाने त्यांच्या पत्नीचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यामुळे, शुकूल यांना चिलकहर येथील सरकारी रुग्णालयात पोहोचण्यासाठी रुग्णावाहिका मिळाली असती तर त्यांच्या पत्नीवर वेळेत उपचार झाले असते, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
सरकारच्या आरोग्य विभागाने 108 ही तातडीची रुग्णसेवा सुरू केली आहे. या रुग्णसेवेचा लाभ सर्वसामान्य, गरिबांसह तात्काळ क्षणी मिळावा, यासाठी करण्यात येतो. मात्र, या रुग्णवाहिकेच्या सेवा पुरविण्यावरच शंका उपस्थित होत आहे. शुकूल राजभर यांच्या 55 वर्षीय पत्नीची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे, त्यांना रुग्णालयात न्यावे लागत होती. त्यासाठी, शुकूल यांनी रुग्णालयात जाण्यासाठी वाहन शोधले. पण, त्यांना ते वाहन मिळाले नाही. अखेर, त्यांनी एका हातगाडीवर पत्नीला झोपवून स्वत: ती गाडी 4 किमीपर्यंत हाताने ओढून नेली. या घटनेचा फोटो व्हायरल झाला असून शुकूल यांना रुग्णावाहिकेची सेवा का मिळाली नाही, असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.