मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या वृद्ध महिलेने त्याच मंदिराला दिली अडीच लाख रूपयांची देणगी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 11:26 AM2017-11-21T11:26:40+5:302017-11-21T11:29:08+5:30
मंदिरात जाताना अनेकदा मंदिरा बाहेर भिकारी बसलेले पाहायला मिळतात. अनेकदा पैसे दिल्याशिवाय भिकारी वाट सोडत नसल्याचे अनुभवही येतात. पण म्हैसूरमध्ये सगळ्यांनाचा आश्चर्य वाटावी अशी घटना घडली आहे.
म्हैसूर- मंदिरात जाताना अनेकदा मंदिरा बाहेर भिकारी बसलेले पाहायला मिळतात. अनेकदा पैसे दिल्याशिवाय भिकारी वाट सोडत नसल्याचे अनुभवही येतात. पण म्हैसूरमध्ये सगळ्यांनाचा आश्चर्य वाटावी अशी घटना घडली आहे. तेथील एका वृद्ध महिलेने मंदिराच्या बाहेर भीक मागून चक्क अडीच लाख रूपयांची देणगी मंदिराला दिली आहे.
एमव्ही सितालक्ष्मी (वय 85) असं या महिलेचं नाव असून गेल्या दहा वर्षापासून ही महिला घरगुती कामं करू शकत नव्हती. घरातील काम करू शकत नसल्याने सितालक्ष्मी या म्हैसूरमधील प्रसन्ना अंजनेया स्वामी मंदिराच्या बाहेर बसलेल्या दिसू लागल्या. मंदिरा बाहेर बसून या वृद्ध महिलेने अडीच लाख रूपये कमावले व ते पैसे त्यांनी मंदिराला देणगी म्हणून दिले. मंदिरातील सुविधा सुधारण्यासाठी तसंच हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात येणाऱ्या भक्तांना प्रसाद देण्यासाठी या महिलेने अडीच लाख रूपयांची देणगी दिली. या महिलेने मंदिराला दिलेल्या योगदानामुळे मंदिरात येणारा प्रत्येक भाविक या महिलेचं कौतुक करतो आहे तसंच त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी जातो आहे.
सितालक्ष्मी या त्यांचा भाऊ आणि वहिनीबरोबर राहत होत्या. पण त्यांना त्यांच्या भावावर अवलंबून राहायचं नव्हतं. घरातील काम करणं शक्य नसल्याने सितालक्ष्मी यांनी घर सोडून मंदिर गाठलं. दिवसभर त्या मंदिराच्या बाहेर बसून राहायचा. मंदिर प्रशासन सितालक्ष्मी यांची काळजी घेतं.
गणपती उत्सवाच्या काळात सितालक्ष्मी यांनी मंदिराला तीस हजार रूपयाची देणगी दिली होती. तसंच काही दिवसांपूर्वी या महिलेने मंदिराला 2 लाख रूपये दिले. एकंदरीतच या वृद्ध महिलेने मंदिराला एकुण अडीच लाख रूपयांची देणगी दिली आहे.
मंदिरात येणाऱ्या भाविकांकडून मला मिळणारे पैसे मी बँकेत जमा केले. माझ्यासाठी देव सर्वकाही आहे. मंदिर प्रशासन माझी काळजी घेत असल्याने माझ्याकडे असल्याने माझ्याकडे असलेले पैसे मी मंदिराला देण्याचा निर्णय घेतला. मंदिरात काम करणारी राजेश्वरी मला आठवड्यातून एकदा आंघोळ करायला मदत करते. भक्तांनी मला दिलेले पैसे जर मी माझ्याजवळ ठेवले तर ते चोरी होण्याची भीती होती. म्हणून ते पैसे मी बँकेत ठेवायचा निर्णय घेतला. हनुमान जयंतीच्या दिवशी भक्तांना चांगला प्रसाद मिळावा हाच हेतू आहे, असं सितालक्ष्मी यांनी म्हंटलं.
मंदिराच्या बाहेर बसणारी ही महिला इतरांपेक्षा वेगळी आहे. त्या कधीही मंदिरात येणाऱ्या भाविकांकडे पैसे देण्याचा आग्रह करत नाही, भक्त जे देतात त्याचाच त्या स्विकार करतात. या वृद्ध महिलेने अगदी उदार मनाने त्यांच्याकडील पैसे मंदिराला दिले. सितालक्ष्मी यांच्या या कामगिरीबद्दल आमदार वासू यांनी त्यांचा सत्कारही केला. भक्तांनीही सितालक्ष्मी यांच्या या कार्याला प्रोत्साहन देत त्यांना पैसे द्यायला सुरूवात केली. काही भक्त सितालक्ष्मी यांना 100 रूपयेसुद्धा देतात तसंच त्यांचा आशिर्वाद आवर्जून घेतात, असं मंदिर ट्रस्टचे चेअरमन एम.बसवराज यांनी सांगितलं.