UP Electiom 2017 : मोदींचा 'अच्छे दिन'वाला सिनेमा फ्लॉप - राहुल गांधी
By admin | Published: March 6, 2017 04:39 PM2017-03-06T16:39:55+5:302017-03-06T16:42:41+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'अच्छे दिन'वाला सिनेमा फ्लॉप झालाय, आता हा सिनेमा पाहायला मिळणार नाही ,असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींच्या रोड शो वर टीका केली
ऑनलाइन लोकमत
जौनपूर, दि. 6 - वाराणसी येथे मोदी यांनी चार वेळा केलेल्या रोड शो वर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, वाराणसी येथे मोदींच्या रोड शोचा फिल्मी रिटेक होत आहेत. त्यांनी चार वेळा रिटेक घेतला आहे. रोड शो नंतर चालत जाऊन जनावारांना चारा खाऊ घातला. पण काशीची हवा आता बदललेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'अच्छे दिन'वाला सिनेमा फ्लॉप झालाय, आता हा सिनेमा पुन्हा पाहायला मिळणार नाही, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींच्या रोड शो वर टीका केली. उत्तर प्रदेशातील जौनपूर मधील सभेत ते बोलत होते.
यावेळी राहुल गांधी यांनी मोदींवर सडकून टीका केली, ते म्हणाले मोदींचे वय झाले आहे. तरीही ते सर्व काही स्वत: करत आहेत, इस्रोने अग्निबाण सोडल्याच्या श्रेयही त्यांनी घेतले. सुषमा स्वराज, राजनाथ सिंह आणि लालकृष्ण अडवाणी यांना हटवून ते काम करत आहेत. मी आणि अखिलेशने मोदींना आराम द्यायचा निर्णय घेतला आहे. अखिलेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यास मोदींना आराम मिळेल.
दरम्यान, उत्तर प्रदेशात सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आजच्याच दिवशी सर्वच पक्षांचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, अखिलेश यादव आणी मायावती यांच्या आज सभा होणार आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्या दिवशी आपल्या वाराणसी लोकसभा मतदार संघात प्रचार करताना दिसतील. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी पूर्वेकडच्या 40 जागांसाठी 8 मार्च रोजी मतदान होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदार संघ वाराणसीचा समावेश असल्याने सर्वांचे लक्ष वाराणसीकडे लागून आहे.