UP Election 2017 - विरोधकांचा एक्झिट पोलवर विश्वास नाही
By admin | Published: March 11, 2017 12:19 AM2017-03-11T00:19:59+5:302017-03-11T00:19:59+5:30
पाच राज्यांच्या विधानसभा निकालांबाबत एक्झिट पोलचे निष्कर्ष गुरूवारी वृत्तवाहिन्यांवर झळकल्यानंतर दिल्लीचे राजकीय तापमान वाढले आहे. शुक्रवारी संसदेतही याचा प्रत्यय आला.
- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
पाच राज्यांच्या विधानसभा निकालांबाबत एक्झिट पोलचे निष्कर्ष गुरूवारी वृत्तवाहिन्यांवर झळकल्यानंतर दिल्लीचे राजकीय तापमान वाढले आहे. शुक्रवारी संसदेतही याचा प्रत्यय आला. सर्वच राजकीय नेत्यांचे सारे लक्ष ११ मार्चच्या निकालांवर केंद्रित झाले असल्याने सेंट्रल हॉलमधे त्यावरच गप्पांचे फड रंगले होते.
संसदेच्या प्रांगणात समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव म्हणाले की, आम्ही १00 टक्के जिंकतो आहोत. आमची पक्की माहिती आहे की एक्झिट पोलच्या आकडेवारीत बदल करण्यासाठी वाहिन्यांवर भरपूर दबाव आणला गेला . राहुल गांधी म्हणाले की, बिहार निवडणुकीच्या निकालांपूर्वीही असेच एक्झिट पोल जाहीर झाले होते. निकालानंतर त्यातला फोलपणा सर्वांना समजला. उत्तर प्रदेशात आमचीच आघाडी सत्तेवर येईल. उद्या निकालानंतर याबाबत अधिक मी बोलेन. राज्यसभा सदस्य नरेश अग्रवाल म्हणाले, उत्तर प्रदेशात बहुमतसमाजवादी आणि काँग्रेस आघाडीलाच मिळणार आहे. संभाव्य निकालांमध्ये आम्हाला कमी लेखण्याचे षडयंत्र नेमके कोणी
कोणी रचले, याचा खुलासा ११ मार्चच्या निकालानंतर आम्ही जरूर करू. मुलायमसिंग म्हणाले की, कोणत्याही पोलवर विश्वास ठेवू नका. मला खात्री आहे की सपा आणि काँग्रेस आघाडीलाच बहुमत मिळेल, आणि अखिलेश यादवच मुख्यमंत्री होतील.
एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री अखिलेश यादवांनी बहुमत आपल्या आघाडीलाच मिळेल, असा दावा करतानाच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रसंगी मायावती यांच्याशी आघाडी करण्याचे
संकेत दिले होते. त्यानंतर मायावतींनीही समाजवादी पक्षाबद्दल नरमाईचे संकेत दिले. त्यावर सपाचे नरेश अग्रवाल म्हणाले की, अखिलेशच्या विधानांचा अर्थ राजकारणात कोणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो असा आह.
भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ मात्र काहीशा संतप्त स्वरात म्हणाले, उत्तर प्रदेशात भाजपला कोणत्याही आघाडीची गरज नाही. राज्यातल्या सर्व वर्गाची मते आम्हाला मिळाली आहेत. भाजपच्या हाती पूर्ण बहुमताचे सरकार सोपवण्याचा निर्णय राज्यातल्या जनतेने कधीच घेतला आहे.
बसपशी तडजोड करण्याआधी लखनौच्या सरकारी विश्रामगृहावर मायावतींवर १९९५ साली हल्ला कोणी चढवला, त्याचे उत्तर अखिलेश यादवांनी द्यावे.
या स्कॅमचीही चौकशी व्हावी
- एक्झिट पोल आणि सट्टा बाजार यांनी संगनमत करून गुरूवारी अंदाज व्यक्त केले. सपा व काँग्रेसच्या बाजूने बेटिंग करायचे आणि दुसऱ्या सट्टा बाजारात भाजपला सत्ता मिळणार यावर जुगार खेळायचा.
- अशी आकडेवारी जाहीर केल्याबद्दल वाहिन्यांच्या मालकांना भरपूर पैसेही कमवता येतात. साहजिकच सर्वांनाच आर्थिक लाभ मिळवून देणारा संभाव्य निकालांचा हा बाजार आहे, असे मत एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या ज्येष्ठ पत्रकाराने सर्वांना ऐकवले.
- असे केल्यास एका ठिकाणी हरलेले पैसे नुकसान न होता दुसऱ्या ठिकाणी वसूल होतात. त्याचबरोबर सर्वत्र भाजपच विजयी होणार, असा मानसिक दबावही निकालापर्यंत जनतेवर ठेवता येतो.
- सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेटमधील मॅच फिक्सिंग व बेटिंगच्या चौकशीसाठी बीसीसीआयची चौकशी केली, त्याच धर्तीवर निवडणुकांच्या निकालपूर्व बाजार मांडून देशाची आर्थिक लूट व मानसिक फसवणूक करणाऱ्या एक्झिट पोल स्कॅमचीही चौकशी व्हायला हवी, असे तो पत्रकार म्हणाला, तेव्हा सर्व पक्षांचेच खासदार अवाक झाले.