UP Election 2017 - ..म्हणून राम मंदिराचा मुद्दा पडला अडगळीत
By admin | Published: February 28, 2017 04:30 PM2017-02-28T16:30:39+5:302017-02-28T16:48:18+5:30
जवळपास अडीच दशकांपूर्वी भाजपाने अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा हाती घेतला. या विषयातील भावनिक गुंतणवूक आणि मतविभाजन लक्षात घेऊन भाजपाने...
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 28 - जवळपास अडीच दशकांपूर्वी भाजपाने अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा हाती घेतला. या विषयातील भावनिक गुंतणवूक आणि मतविभाजन लक्षात घेऊन भाजपाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत पक्षविस्तार केला आणि केंद्रासह अनेक राज्यांची सत्ता मिळवली. पण नुकत्याच झालेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने राम मंदिराच्या विषयाला प्रमुख मुद्दा बनवण्याचे टाळले किंवा तो विषय विरोधकांकडून ऐरणीवर येणार नाही याची काळजी घेतली.
'मंदिर वही बनाऐंगे' ही काहीवर्षांपूर्वीची भाजपाची भूमिका वेळेनुसार सौम्य झाली आहे. भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात राम मंदिराला स्थान दिले असले तरी, संवैधानिक चौकटीत राहून राम मंदिराचे निर्माण करु असे म्हटले आहे. याचे कारणही तसेच आहे. संवेदनशील विषयांवर भावानांचा खेळ करुन सत्ता मिळवण्याच्या पक्षीय राजकारणाला मतदार आता थारा देत नाहीत. जो विकासाची भाषा बोलतो त्याच्या पाठिशी मतदार उभे राहतात. त्यामुळे भाजपाने उत्तरप्रदेशच्या प्रचारात विकासाच्या मुद्यावर भर दिला.
उत्तरप्रदेशच्या राजकारणात मुस्लिम मतेही निर्णायक ठरतात. पण भाजपाने मुस्लिम मतदारांच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न न करता अन्य मतदारांवर जास्त भर दिला आहे. आपण जातीयवादाच्या बाजूने आहोत हा संदेश जाऊ नये यासाठी भाजपाने खासदार योगी आदित्यनाथ, साक्षी महाराज या कट्टर हिंदुत्वाच्या चेह-यांना पोस्टरबॉय बनवण्याचे टाळले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाताही विकासाचाच मुद्दा होता. हिंदुत्वाचा मुद्दा कितपत उत्तरप्रदेशात चालेल याची चाचपणी भाजपाने 2014 मध्येच केली होती. 2014 साली भाजपाने केंद्राची सत्ता मिळवल्यानंतर उत्तरप्रदेशात काही जागांवर पोटनिवडणूका झाल्या होत्या. त्यावेळी योगी आदित्यनाथ यांना आक्रमक भाषणे करायला मुक्तवाव दिला होता. पण त्याने भाजपाच्या पदरात फारसे काही पडले नाही. मतदारांनी समाजवादी पक्षाच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे भाजपाने राम मंदिराला प्रमुख मुद्दा बनवण्याचे टाळले.