UP Election 2017 : सपा यशाची पुनरावृत्ती करणार काय?
By admin | Published: March 2, 2017 04:56 AM2017-03-02T04:56:15+5:302017-03-02T13:20:15+5:30
समाजवादी पार्टीने प्रामुख्याने मध्य क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर प्रचंड बहुमतासह राज्यात सत्ता काबीज केली
लखनौ : उत्तर प्रदेशात २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने प्रामुख्याने मध्य क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर प्रचंड बहुमतासह राज्यात सत्ता काबीज केली होती. त्याचप्रमाणे यावेळीसुद्धा सपा आपल्या यशस्वी कामगिरीची पुनरावृत्ती करणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत सपाने एकूण ४०३ पैकी २२४ जागा जिंकल्या होत्या. राज्यातील यादवबहुल मध्य क्षेत्रात या पक्षाने आपल्या प्रतिस्पर्र्धींना धोबीपछाड देत एकूण ९८ पैकी ७६ जागांवर आपले उमेदवार निवडून आणले होते. परंतु बहुजन समाज पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या बुंदेलखंडमध्ये मात्र पक्ष बसपाच्या तुलनेत मागे पडला होता. पश्चिम उत्तर प्रदेशात सपा आणि बसपात काट्याची टक्कर होती आणि या क्षेत्रात सपाला २९ तर बसपाला २८ जागा मिळाल्या होत्या. अर्थात पूर्वांचलमध्ये मात्र सपाने जबरदस्त कामगिरी करीत बसपाचे गर्वहरण केले होते. येथे सपाने १५० पैकी ८५ जागांवर कब्जा केला होता. इ.स. २००७ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाने सोशल इंजिनीअरिंगच्या बळावर पूर्वांचलात ७९ जागा मिळविल्या होत्या. पण २०१२ मध्ये पक्षाची घसरण होत तो २५ जागांवर पोहोचला. २०१२ च्या विधानसभा निवडणूक निकालावर नजर टाकल्यास असे लक्षात येते की, मध्य उत्तर प्रदेशातील निकालांनी विजयाचे गणित निश्चित केले होते. खरे तर हा यादवबहुल पट्टा मानला जातो. परंतु गेल्या निवडणुकीत सपाला येथे लॉटरीच लागली, असे म्हणता येईल. कारण या पक्षानेसुद्धा एवढ्या चांगल्या निकालांची अपेक्षा केली नव्हती. सपाने रुहेलखंडमध्येसुद्धा चांगली कामगिरी बजावली होती. या क्षेत्रात तिने ५२ पैकी २९ जागांवर विजयाची पताका फडकविली होती. बसपा मात्र येथे फारशी चांगली कामगिरी बजावू शकली नाही.(वृत्तसंस्था)
>सहाव्या टप्प्याचा प्रचार आज थांबणार
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सहाव्या टप्प्यातील प्रचार तोफा आज गुरुवारी सायंकाळी ५ वाजता शांत होणार आहेत.
या सहाव्या टप्प्यात सपाचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांच्या लोकसभा मतदारसंघातील आजमगडसह पूर्वांचलच्या सात जिल्ह्यांमध्ये ४९ जागांसाठी ४ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्याचा प्रचार गुरुवारी सायंकाळी थांबेल. या टप्प्यात भाजपा खसदार महंत आदित्यनाथ यांच्या गोरखपूर लोकसभा मतदारसंघातही मतदान होईल.
गोरखपूर येथे सर्वाधिक २३ उमेदवार रिंगणात आहेत. तर सर्वांत कमी ७ उमेदवार मऊ जिल्ह्याच्या मोहम्मदाबाद गोहना येथे नशीब आजमावत आहेत.
या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये बसपा सोडून भाजपात आलेले स्वामी प्रसाद मौर्य, भाजपाचे सूर्यप्रताप शाही, श्याम बहादूर यादव, अंबिका चौधरी आणि नारद राय या दिग्गजांचा समावेश आहे.
>२०१२-सपाची कामगिरी
४०३ पैकी
२२४ जागा - संपूर्ण राज्यात
९८ पैकी ७६ जागा - मध्य क्षेत्र
५२ पैकी २९ जागा - रुहेलखंड
>बुंदेलखंडात
पराभवाचा सामना
राज्यातील सर्वात मागासलेले समजले जाणारे बुंदेलखंड हे एकमेव क्षेत्र असे आहे जेथे सपा माघारली होती. दुसरीकडे भाजपाने मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना येथील चरखारी क्षेत्रातून उमेदवारी देऊन या क्षेत्रात आपला जम बसविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो अपयशी ठरला.
पश्चिमेतही
काट्याची लढत
पश्चिम उत्तर प्रदेशात सपा आणि बसपात काट्याची लढत झाली होती. हे क्षेत्र म्हणजे बसपाचा पारंपरिक गड मानला जात असला तरी, काही भागात भाजपा आणि राष्ट्रीय लोकदलाचाही दबदबा आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत सपाला मुस्लिमांचा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला होता.