2019ची निवडणूक रेकॉर्डब्रेक जागांसह जिंकणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 04:53 AM2018-08-12T04:53:32+5:302018-08-12T04:53:48+5:30
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकून विजयी होऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली - पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा जिंकून विजयी होऊ, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. जनतेला भक्कम आणि निर्णयक्षम सरकार हवे आहे. जे चांगली कामगिरी करू शकेल, असेही त्यांनी सांगितले.
टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला ई मेलद्वारे दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी पुढील सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. तसेच मॉब लिंचिंगबाबत चिंता व्यक्त केली आहे. प्रामाणिकपणे उद्योगधंदे चालवणाऱ्यांना संरक्षण देण्याचे आणि भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा देण्याचे आश्वासन मोदींनी दिले. सध्या आसाममध्ये पेटलेल्या नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स पूर्ण करण्याचे काम करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "असमान आणि हताश झालेल्या परस्परविरोधी पक्षांच्या समुह म्हणजे महाआघाडी नव्हे तर राजकीय उतावळेपणा आहे. पुढच्या निवडणुकीत आपल्या कामाचा मंच विकास, वेगवान विकास आणि सर्वांचा विकास हा असेल. तसेच आमच्या पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा निश्चितपणे अधिका जागा मिळतील. आम्ही याआधीचा विक्रम मोडीत काढू, असा मला विश्वास आहे."
यावेळी मोदींनी एनआरसीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीकास्र सोडले. आसाममधील एनआरसीच्या मुद्द्यावरून मतांचे राजकारण सुरू आहे. 1972 आणि 1982 मध्ये काँग्रेसचे सरकार असताना एनआरसीची अंमलबजावणी टाळले गेले होते." असेही ते म्हणाले.