UP Election 2022: योगी आदित्यनाथ यूपीत इतिहास रचणार; भाजपा किती जागांवर विजयी होणार? वाचा ओपिनियन पोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 10:52 PM2022-01-17T22:52:54+5:302022-01-17T22:58:01+5:30
ओपिनियन पोलमध्ये पूर्वांचलमध्ये भाजपा आणि सपा यांच्यात जोरदार लढत होताना दिसत आहे.
लखनऊ – यूपी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. सर्वच पक्ष व्हर्चुअल रॅलीच्या माध्यमातून प्रचाराला लागत ४०३ उमेदवारांची यादी बनवण्याचं काम करत आहेत. अशावेळी निवडणुकीत लोकांचा कल जाणून घेण्यासाठी विविध पोल घेतले जातात. इंडिया टीव्ही ओपिनियन पोलमध्ये भाजपाला २३०-२३५ जागा मिळून पुन्हा उत्तर प्रदेशातील सत्तेत परतण्याचे संकेत मिळत आहेत.
समाजवादीला १६०-१६५ जागा मिळण्याचा अंदाज
ओपिनियन पोलमध्ये समाजवादी पक्ष एकमेव पक्ष आहे जो भाजपाला टक्कर देताना दिसत आहे. ओपिनियन पोलमध्ये भाजपाला राज्यात ४०३ विधानसभा जागेपैकी २३०-२३५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर समाजवादी पक्षाला १६०-१६५ जागा मिळतील असं सांगितले जात आहे. तर काँग्रेसला ३-७ आणि बसपाला २-५ जागा मिळण्याचा कौल आहे.
पूर्वांचलमध्ये भाजपाला फटका बसण्याची शक्यता
ओपिनियन पोलमध्ये पूर्वांचलमध्ये भाजपा आणि सपा यांच्यात जोरदार लढत होताना दिसत आहे. ओपिनियन पोलमध्ये पूर्वांचलमध्ये १२४ जागांपैकी भाजपाला ६६ जागा मिळण्याचा अंदाज आहे तर समाजवादी पक्षाला ५१ जागा तर बसपा २, काँग्रेसला ३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०१७ मध्ये भाजपाला पूर्वांचलमध्ये ९४ जागांवर विजय मिळाला होता. तर समाजवादी पक्षाला १४ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. तर बसपा १० आणि काँग्रेसनं २ जागांवर विजय पटकावला होता.
योगी आदित्यनाथ यांचा मोठा विजय
ओपिनियन पोलनुसार, गोरखपूर येथे मुख्यमत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा विजय मिळण्याची शक्यता आहे. पूर्वांचल क्षेत्रात येणाऱ्या गोरखपूर हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वत: १९९८ पासून गोरखपूर येथून रेकॉर्ड स्तरावर खासदार म्हणून निवडून येत आहेत. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनल्यानंतर योगींना खासदारकी सोडली. त्यानंतर विधान परिषदेहून ते आमदार म्हणून निवडून आले. यंदाची निवडणूक योगी आदित्यनाथ यांच्या ५ वर्षाच्या कारभारावर लढवली जाणार आहे. निवडणुकीपूर्वीच भाजपाला समाजवादी पक्षाने जोरदार धक्के दिलेत. भाजपाचे मंत्री आणि आमदार एकापाठोपाठ एक पक्षाला रामराम करत समाजवादी पक्षात गेले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात मुख्य लढत समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात पाहायला मिळणार आहे.