UP Election 2022: योगी आदित्यनाथ प्रथमच लढवणार विधानसभा निवडणूक; कोणत्या जागेवर उमेदवारी मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 03:33 PM2022-01-02T15:33:12+5:302022-01-02T15:34:21+5:30
UP Election 2022: मुख्यमंत्री झाल्यावर योगी आदित्यनाथ यांनी विधान परिषदेचे सदस्यत्व घेतले आहे.
लखनऊ:उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची (UP Election 2022) धामधूम मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. हळूहळू प्रचारसभांना वेग येत असून, सर्वपक्षीयांनी या निवडणुकीसाठी चांगलाच जोर लावल्याचे दिसत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे, हाच मुख्य अजेंडा या निवडणुकीसाठी विरोधकांचा असल्याचे बोलले जात आहे. यातच आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. योगी आदित्यनाथ यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे योगी आदित्यनाथ प्रथमच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
योगी आदित्यनाथ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गोरखपूरमधून खासदार म्हणून निवडून आले होते. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी नंतर विधान परिषदेचे सदस्यत्व घेतले. त्यांनी आतापर्यंत एकदाही विधानसभेची निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे यावर्षी निवडणूक लढवल्यास ती त्यांची पहिली विधानसभा निवडणूक ठरेल, असे म्हटले जात आहे.
कोणत्या जागेवर उमेदवारी मिळणार?
योगी आदित्यनाथ निवडणुकीला उभे राहिल्यास त्यांचा मतदारसंघ कोणता असेल, कोणत्या ठिकाणाहून त्यांना उमेदवारी मिळेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, माझ्या निवडणूक लढवण्याबाबत कोणतीही शंका नाही. पण मी कुठून निवडणूक लढवायची हे पक्ष नेतृत्व ठरवेल. कोणत्याही जागेला माझी वैयक्तिक पसंती नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपाचाच विजय होईल. भाजपाच्या तीनशेहून अधिक जागा येतील, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आम्ही आश्वासन दिलेल्या सर्व गोष्टी आम्ही केल्या. असे कोणतेही काम उरले नाही ज्यासाठी मला पश्चात्ताप वाटेल. आमच्या जनविश्वास यात्रा सुरू आहेत. यानंतर राज्यात अधिक चांगले वातावरण पाहायला मिळेल, असेही योगी आदित्यनाथ म्हणालेत.