UP Election 2022: “मुस्लिम समाज आता आम्हाला मते देणार नाही, कारण आम्ही राम मंदिर बांधले, कलम ३७० हटवले”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 10:02 AM2021-12-30T10:02:12+5:302021-12-30T10:03:26+5:30
UP Election 2022: पाकिस्तान आणि दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांची मते पक्षाला नकोच, असे भाजप नेत्याने म्हटले आहे.
लखनऊ: पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींकडे देशाचे लक्ष लागेल आहे. सर्वाधिक नजरा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांवर (UP Election 2022) असणार आहेत. सर्व पक्षांकडून जोरदार प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजपला सत्ता राखणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे सर्वपक्षीय नेते वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. यातच आता भाजपच्या एका नेत्याने खळबळजनक विधान केले आहे. मुस्लिम समाज आता आम्हाला मते देणार नाही. कारण आम्ही राम मंदिर बांधले आणि अनुच्छेद ३७० हटवले, असा दावा करण्यात आला आहे.
कन्नौज येथे एका जनसभेला संबोधित करताना भाजप खासदार सुब्रत पाठक यांनी मुस्लिम समाजाबाबत सदर विधान केले आहे. राम मंदिरांसारख्या मुद्द्यामुळे भाजपला मुस्लिम बांधवांची मते मिळणार नाहीत, असे पाठक म्हणाले. आम्ही १०० घरे बांधली तर, त्यातील ३० घरे मुस्लिम बांधवांचीही असतील. मात्र, असे असूनही आम्हाला मते देणार नाहीत. कारण चांगल्या गोष्टी केल्यात ते विसरून केवळ कलम ३७० रद्द केल्याचे लक्षात ठेवले जाते. याच कारणासाठी मते देणार नाही, असा दावा पाठक यांनी केला.
दहशतवादाला समर्थन करणाऱ्यांची मते नकोच
अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर बांधले जात आहे, काशी-विश्वनाथ कॉरिडोरचेही लोकार्पण करण्यात आले. आता मथुराची वेळ आली आहे. ज्यांना मते द्यायची आहेत, ते देतील. मात्र, भाजपला दहशतवादाचे समर्थन करणारे, पाकिस्तानच्या बाजूने घोषणा देणारे तसेच भारतात शरिया कायदा लागू करण्याची दिवास्वप्ने पाहणाऱ्यांची मते नकोच आहेत, असे पाठक यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशातील सत्ता कायम राखेल असा अंदाज आहे. टाईम्स नाऊ आणि पोलस्ट्रेटच्या ओपिनियन पोलनुसार, पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल. भाजपला ४०३ पैकी २३९ ते २४५ जागा मिळू शकतील, असे सर्वेक्षण सांगते. तर समाजवादी पक्षाला ११९ ते १२५ जागा मिळतील असा अंदाज आहे. बहुजन समाज पक्ष ३० जागांसह तिसऱ्या, तर काँग्रेस ५ ते ८ जागांसह चौथ्या क्रमांकावर असेल, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते.