UP Election 2022: म्हणून योगी आदित्यनाथ अयोध्या, मथुरेऐवजी गोरखपूरमधून निवडणूक लढवणार, समोर आलं मोठं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 05:24 PM2022-01-15T17:24:48+5:302022-01-15T17:25:11+5:30
Uttar Pradesh Assembly Election 2022: Yogi Adityanath हे विधानसभेची निवडणूक श्रीरामाची जन्मभूमी असलेली Ayodhya किंवा श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या Mathuraमधून लढवतील, अशी चर्चा होती. मात्र अखेरीस गुरू गोरखनाथांची भूमी असलेल्या Gorakhpur मधून ते निवडणूक लढवतील, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भाजपाने सर्व चर्चांना पूर्णविराम देत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गोरखपूर शहर मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे. योगी आदित्यनाथ हे विधानसभेची निवडणूक श्रीरामाची जन्मभूमी असलेली अयोध्या किंवा श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या मथुरेमधून लढवतील, अशी चर्चा होती. मात्र अखेरीस गुरू गोरखनाथांची भूमी असलेल्या गोरखपूरमधून ते निवडणूक लढवतील, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
योगी आदित्यनाथ यांना गोरखपूरमधून निवडणूक लढवण्याचे मुख्य कारण म्हणजे हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. १९६७ पासून येथे भाजपाचा कधीही पराभव झालेला नाही. गेल्या चार विधानसभा निवडणुकांमध्ये येथून भाजपाचे राधा मोहनदास अग्रवाल निवडून येत आहेत. मात्र यावेळी त्यांचे तिकीट कापण्यात आले आहे.
गोरखपूरमधून योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक लढवून गोरखपूर-बस्ती विभागातील ४१ जागांवर प्रभाव पाडण्याची भाजपाची रणनीती आहे. २०१७मध्ये भाजपाने येथील ४१ पैकी ३७ जागा जिंकल्या होत्या. गोरखपूर जिल्यातील नऊपैकी आठ मतदारसंघात भाजपचा विजय झाला होता. आता या विजयाची पुनरावृत्ती करण्याची जबाबदारी योगी आदित्यनाथ यांच्यावर असेल.
मात्र आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात तब्बल ४२ वेळा अयोध्येचा दौरा करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतून निवडणूक न लढवण्यामागेही एक मोठे कारण आहे. ते म्हणजे अयोध्येत सध्या सुरू असलेल्या विकास कामांबाबत लोकांच्या मनात नाराजी आहे. काही ठिकाणी जमीन अधिग्रहणावरून राग आहे तर कुठे दुकान रिकामे केल्यामुळे नाराजी आहे. अशा परिस्थितीत योगींनी अयोध्येतून निवडणूक लढवली असती तर त्यांना अनेक अडचणी आणि आव्हानाचा सामना करावा लागला असता.
तर उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी मथुरेचा मुद्दा समोर आणण्यात आला होता. त्यामुळे योगी मथुरेमधून निवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. राज्यसभा खासदार हरनाथ सिंह यादव यांनी योगींनी मथुरेमधून लढावे यासाठी पत्रही लिहिले होते. मात्र मथुरेमधून योगी आदित्यनाथ यांच्याऐवजी श्रीकांत शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मथुरा हा ब्राह्मण बहुल मतदारसंघ आहे. तसेच येथून काँग्रेसचे प्रदीप माथूर चारवेळा जिंकले होते. पण २०१७ मध्ये श्रीकांत शर्मा यांनी त्यांचा पराभव केला होता.
राजकीय तज्ज्ञांच्या मते अयोध्या किंवा मथुरेमधून निवडणूक लढवली असती तर योगी आदित्यनाथ यांना अधिक मेहनत घ्यावी लागली असती. पण गोरखपूरमधून योगींना निवडून येणे सोपे आहे. तसेच योगी येथून लढल्यास त्याचा प्रभाव हा गोरखपूर, कुशीनगर, महाराजगंज, देवरिया, संतकबीरनगरसह अनेक जिल्ह्यातील राजकीय समिकरणांवर पडणार आहे.