UP Election: अखिलेशना दलित सोबत नकोत, पण त्यांची व्होट बँक हवीय; भीम आर्मीच्या चंद्रशेखर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 11:51 AM2022-01-15T11:51:41+5:302022-01-15T11:52:42+5:30
Chandrashekhar Azad reject alliance with Akhilesh Yadav: अखिलेश यांना वंचित वर्गाची काळजी आहे की नाही याची मला चिंता आहे, त्यामुळे पाठदुखी असूनही मी दोन दिवस लखनऊमध्ये आहे. मी अखिलेशच्या उत्तराची वाट पाहत होतो पण प्रतिसाद मिळाला नाही, असे चंद्रशेखर म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने भीम आर्मीसोबत जाण्यात रस न दाखविल्याने अखेर भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी सपासोबत जात नसल्याची घोषणा केली आहे. राज्यात आता निवडणुकीचे वारे सुरु झाले असून गेल्या सहा महिन्यांपासून सकारात्मक सुरु असलेली चर्चा अखेरच्याक्षणी फिस्कटली आहे.
गेल्या महिनाभरापासून मी अखिलेश यांच्या संपर्कात होतो. अनेक प्रकारच्या चर्चा होत होत्या. परंतू त्यांच्यासोबतच्या चर्चेतून आम्हाला असे समजले की, त्यांना बहुजन समाज सोबत नको आहे. त्यांना फक्त आमची मते हवी आहेत. य़ामुळे अखेरच्या क्षणी आम्ही सपासोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतल्याचे चंद्रशेखर यांनी स्पष्ट केले.
असे असले तरी देखील भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे चंद्रशेखर म्हणाले. माझ्याविरोधात शेकडो गुन्हे दाखल केले गेले. १६ महिने मी तुरुंगात देखील होतो. एवढे सगळे करूनही अखिलेशना दलित नेता नको आहे. परंतू त्यांना दलितांचे मत हवे आहे. दलितांनी जर त्यांना मत दिले तर याचा वेगळाच संदेश जाईल. मी काशीरामना आपला नेता मानतो. त्यांनीच मुलायम सिंगांना मुख्यमंत्री बनविले होते. यानंतर काय झाले सर्वांनाच माहिती आहे. या भीतीने आम्ही अखिलेश यांच्यासोबत चर्चा करत होतो, असेही चंद्रशेखर यांनी सांगितले.
अखिलेश यांना वंचित वर्गाची काळजी आहे की नाही याची मला चिंता आहे, त्यामुळे पाठदुखी असूनही मी दोन दिवस लखनऊमध्ये आहे. मी अखिलेशच्या उत्तराची वाट पाहत होतो पण प्रतिसाद मिळाला नाही. चंद्रशेखर म्हणाले की, अखिलेश यादव यांना सामाजिक न्याय समजलेला नाही. चंद्रशेखर यांनी अखिलेश यांच्यावर दलितांच्या बाबतीत मौन बाळगल्याचा आरोप केला.