प्रचाराचा काळ! आता तेलंगणात बीआरएस आमदाराच्या घरी आयकर विभाग पोहोचला; छापेमारी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 11:44 AM2023-11-16T11:44:37+5:302023-11-16T11:59:55+5:30
13 नोव्हेंबर रोजी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेलंगणाच्या मंत्री सबिता इंद्रा रेड्डी यांच्या जवळच्या लोकांच्या घरावर छापे टाकले होते.
तेलंगणात निवडणूक सुरु असताना आयकर विभागाने सत्ताधारी बीआरएस पक्षाच्या आमदार उमेदवारावर छापा मारला आहे. आमदार नल्लामोथू भास्कर राव यांच्या घर आणि कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आली आहे. यामुळे ऐन निवडणूक काळात राज्यात खळबळ उडाली आहे.
भास्कर राव मिर्यालागुडा येथून आमदार आहेत. त्यांच्या काही निकटवर्तीयांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. बीआरएसच्या तिकीटावर ते पुन्हा निवडणूक लढवत आहेत.
भास्कर राव हे मूळचे नलगोंडा जिल्ह्यातील निदामनुन मंडळातील शाकापुरम गावचे रहिवासी आहेत. 2014, 18 मध्ये ते मिर्यालागुडा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. १९६९ मध्ये वेगळ्या तेलंगणा राज्याच्या आंदोलनात सामील झालेल्या पहिल्या नेत्यांपैकी राव एक होते. त्या काळात ते एसआर-बीजीएनआर कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनेचे सचिवही होते.
13 नोव्हेंबर रोजी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेलंगणाच्या मंत्री सबिता इंद्रा रेड्डी यांच्या जवळच्या लोकांच्या घरावर छापे टाकले होते. 2019 पासून त्या तेलंगणाच्या शिक्षणमंत्री आहेत. इन्कम टॅक्सने प्रदीप नावाच्या व्यक्तीच्या घराचीही झडती घेतल्याचे सांगण्यात आले. तो मंत्र्याचा जवळचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले.