UP Election : उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का, सलग 3 ऱ्या दिवशी तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 03:39 PM2022-01-13T15:39:43+5:302022-01-13T16:01:10+5:30
उत्तर प्रदेशचे पर्यावरणमंत्री दारासिंह चौहान यांनी गुरुवारी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला. राज्यातील दलित, वंचित आणि मागासवर्ग, शेतकरी आणि बेरोजगारी संदर्भातील सरकारने उपेक्षा केली आहे
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांची घोषणा होताच भाजपला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मंगळवारी जबर धक्का बसला. योगी सरकारमधील बलाढ्य मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पदासोबत भाजपाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर, युपीतील आणखी एका मंत्र्याने राजीनामा दिला असून आता सलग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या मंत्र्याने राजीनामा दिल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशचे पर्यावरणमंत्री दारासिंह चौहान यांनी गुरुवारी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला. राज्यातील दलित, वंचित आणि मागासवर्ग, शेतकरी आणि बेरोजगारी संदर्भातील सरकारने उपेक्षा केली आहे. तसेच, मागास आणि ओबीसी प्रवर्गाकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं दिसून आलेय. त्यामुळे, मी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देतोय, असे दारासिंह यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले होते. आता, युपीचे आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. धर्मसिंह सैनी यांनीही राजीनामा दिला आहे. ज्या अपक्षेनं दलित, मागास, शेतकरी, बेरोजगार युवक आणि लहान-सहान व्यापारी व छोटे उद्योजक यांनी राज्यात एकत्रितपणे भाजपचे सरकार बनिण्याचं काम केलं. मात्र, या सर्वांची आणि त्यांच्या लोकप्रतिनीधींची सातत्याने उपेक्षा होत आहे, त्यामुळेच मी मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं सैनी यांनी म्हटलं आहे.
UP Minister Dharam Singh Saini resigns pic.twitter.com/Ey7fxThUtN
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 13, 2022
सैनी यांनी राज्यपालांच्या नावे आपला राजीनामा लिहिला असून गेल्या 3 दिवसांतील हा तिसरा राजीनामा आहे. त्यामुळे, भाजपमध्ये मोठं खिंडार पडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही आज शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली आहे. तर, शरद पवार यांनीही अनेक आमदार भाजप सोडत असल्याचे म्हटले आहे.
UP: After quitting as a minister, Dharam Singh Saini meets Samajwadi Party president Akhilesh Yadav
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 13, 2022
"I welcome him to the Samajwadi Party," Yadav tweets pic.twitter.com/jPhHd66tOx
स्वामी प्रसाद मौर्य यांचा सपात प्रवेश
स्वामी प्रसाद मौर्य यांनी तडकाफडकी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर अखिलेश यादव यांची भेट घेच समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर या पक्षप्रवेशाची अखिलेश यादव यांनी ट्विट करत माहिती दिली. त्यात अखिलेश यादव म्हणाले की सामाजिक न्याय आणि समता-समानतेची लढाई लढणारे लोकप्रिय नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्यासोबत आलेल्या अन्य सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे समाजवादी पक्षामध्ये स्वागत आहे. उत्तर प्रदेशात सामाजित न्यायामध्ये इन्कलाब होईल, २०२२ मध्ये परिवर्तन होईल. दरम्यान स्वामी प्रसाद मौर्य यांनी २०१७ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते पडरौना मतदारसंघातून निवडून आले होते. ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले होते.