निवडणूक ब्रिटनची, चर्चा मात्र भारतीय महिलेची
By Admin | Published: June 9, 2017 02:17 PM2017-06-09T14:17:01+5:302017-06-09T14:49:04+5:30
ब्रिटन संसदेत पहिल्यांदाच शीख महिला आणि पगडीधारी खासदाराची निवड झाली आहे
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 9 - ब्रिटनमधील सर्वसाधारण निवडणुकांचे निकाल हाती येत असून यानिमित्ताने ब्रिटन संसदेत पहिल्यांदाच शीख महिला आणि पगडीधारी खासदाराची निवड झाली आहे. प्रीत कौर गिल असं या महिला खासदाराचं नाव असून भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. प्रीत कौर गिल भारतीय वंशाच्या असून लेबर पार्टीकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. प्रीत कौर गिल यांनी बर्मिंगहॅम एडबॅस्टनमधून निवडणूक लढवली. 24 हजार 124 मतं मिळवून त्यांनी ही जागा जिंकली. प्रीत कौर गिल यांनी सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्या उमेदवार कॅरलिन स्क्वायर यांचा सहा हजार 917 मतांनी पराभव केला.
"जिथे माझा जन्म झाला, जिथे मी लहानाची मोठी झाली त्या बर्मिंगहॅम एडबॅस्टनमची खासदार बनण्याची संधी मिळाल्याने मी प्रचंड आनंदी आहे. कष्ट घेऊन, आवडीने आणि स्वत:ला समर्पित करत मी लोकांसाठी काम करेन. एकत्र काम केल्यास आम्ही अनेक गोष्टी मिळवू शकतो", अशी प्रतिक्रिया प्रीत कौर गिल यांनी दिली आहे.
तन्मनजीत सिंग धेसी यांनी 34 हजार 170 मतं मिळवत लेबर पक्षाचे पहिले पगडीधारी खासदार होण्याचा मान पटकवला आहे. त्यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या उमेदवाराचा 16,998 मतांनी पराभव केला. धेसी यांनी आपला जिथे जन्म झाला, वाढलो तिथल्या लोकांची सेवा करण्याची इच्छा होती असं सांगितलं आहे. लेबर पार्टीतर्फे एकूण 14 भारतीय वंशाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.