निवडणूक आयोगाची शशिकलांना टोपी, तर पनीरसेल्वमना मिळाला विजेचा खांब
By admin | Published: March 23, 2017 02:50 PM2017-03-23T14:50:06+5:302017-03-23T14:50:06+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमधील सत्ता संघर्ष उफाळून आला
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - गेल्या काही दिवसांपूर्वी जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमधील सत्ता संघर्ष उफाळून आला होता. मात्र त्यावेळी पनीरसेल्वम यांच्यावर शशिकलांनी मात केल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. जयललितांच्या निधनामुळे तामिळनाडूमधील आर. के. नगरमधल्या जागेवर 12 एप्रिलला पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्या निमित्तानं पुन्हा एकदा अण्णाद्रमुकमधले शशिकला आणि पनीरसेल्वम गट आमने-सामने आले होते.
दोन्ही गटांनी अण्णाद्रमुकच्या चिन्हावर दावा केला होता. त्यावेळी निवडणूक आयोगानं ते चिन्हच गोठवलं होतं. आता निवडणूक आयोगानं शशिकलांच्या गटाला टोपी(hat), तर पनीरसेल्वम यांच्या गटाला विजेचा खांब (electricity pole) ही चिन्हांचं वाटप केलं आहे. तसेच निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना वेगवेगळे नाव देण्यास मंजुरी दिली आहे. शशिकलांच्या गटाला ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र अम्मा(एआईएडीएमके अम्मा) तर पनीरसेल्वम यांच्या गटाला एआईएडीएमके पुराट्ची थलैवी अम्मा हे नाव बहाल करण्यात आलं आहे. दोन्ही गटांनी अण्णाद्रमुकच्या निवडणूक चिन्हावर दावा केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगानं ते चिन्हच गोठवलं होतं.
शशिकलांच्या गटानं निवडणूक आयोगाकडे स्वतःच्या पक्षाचं एआईएडीएमके अम्मा या नावासाठी आग्रह धरला होता. शशिकलांच्या गटानं निवडणूक आयोगाकडे निवडणूक चिन्हासाठी तीन पर्यायही ठेवले होते. त्यात ऑटो रिक्षा, बॅट आणि हॅट यांचा समावेश होता. शशिकला गटाला निवडणूक आयागोनं रिक्षा हे चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नंतर त्यांच्या आग्रहाखातर त्यांना टोपी(hat) हे चिन्ह देण्यात आलं आहे.