निवडणूक आयोगाने असे शोधले देशातील पहिल्या मतदाराला; निवासस्थानी केला सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 04:05 AM2019-03-30T04:05:58+5:302019-03-30T04:10:02+5:30
भारत स्वतंत्र झाल्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकांत (१९५१) हिमाचल प्रदेशमधील किन्नोर येथून सर्वांत प्रथम मतदान केलेले श्यामसरन नेगी यांची प्रयत्नपूर्वक सारी माहिती मिळवून निवडणूक आयोगाने त्यांना शोधून काढले.
सिमला : भारत स्वतंत्र झाल्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकांत (१९५१) हिमाचल प्रदेशमधील किन्नोर येथून सर्वांत प्रथम मतदान केलेले श्यामसरन नेगी यांची प्रयत्नपूर्वक सारी माहिती मिळवून निवडणूक आयोगाने त्यांना शोधून काढले.
देशातील पहिले मतदार असा बहुमान मिळविलेले नेगी १०२ वर्षांचे असून त्यांनी आजवर झालेल्या प्रत्येक निवडणुकांत आपला हक्क बजावला आहे. सुमारे ४५ वर्षे प्रसिद्धीच्या झोतापासून लांब असलेले नेगी आगामी लोकसभा निवडणुकांतही तितक्याच उत्साहाने मतदान करणार आहेत. किन्नोर मतदारसंघातील हिवाळा व होणारी हिमवृष्टी लक्षात घेऊन तिथे निवडणुकांत सर्वांत
आधी मतदान घेतले जाते.
हिमाचल प्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विद्यमान अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा नंदा यांची जुलै २००७ साली किन्नोरच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्या वेळी मतदारयाद्या पाहताना त्यांना वयोवृद्ध श्यामसरन नेगी यांच्याविषयी माहिती मिळाली. त्यानंतर कल्पा गावात झालेल्या भेटीत आपण स्वतंत्र भारताचे पहिले मतदार आहोत, असे नेगी यांनी सांगताच नंदा यांनी ही माहिती निवडणूक आयोगाला कळवली. मनीषा नंदा यांनी स्थानिक स्तरावर तसेच निवडणूक आयोगाने आपल्या मुख्यालयातील दस्तावेज तपासून नेगी यांचे म्हणणे खरे असल्याचा निर्वाळा दिला. नेगींना शोधून काढणे हा अनुभव मला एखादी पीएच.डी. मिळविण्यासारखाच होता असे मनीषा नंदा म्हणाल्या. त्यानंतर २०१२ साली तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी श्यामसरन नेगी यांची कल्पा गावातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सत्कार केला.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांत मतदानाला प्रोत्साहन देण्याकरिता गुगलने नेगींवर खास व्हिडीओफीतही बनविली होती. नेगी आता
साऱ्या देशाचे आकर्षण बनले असून त्यांचा मतदानाबद्दलचा उत्साहही वाखाणण्यासारखा आहे. (वृत्तसंस्था)
असे केले प्रथम मतदान
श्यामसरन नेगींचा जन्म १ जुलै १९१७ रोजी झाला. ते एका सरकारी शाळेत शिक्षक होते. पहिल्या लोकसभा निवडणुकांत त्यांना निवडणुकीच्या कामावर नेमण्यात आले होते. त्या वेळी किन्नोर केंद्रातून मतदान करू देण्याची नेगींनी केलेली विनंती तेथील अधिकाऱ्याने मान्य केली. त्यानुसार नेगींनी मतदान केले व ते देशातील पहिले मतदार ठरले.