Corona in India: आरोग्य मंत्रालय आणि निवडणूक आयोगाची बैठक सुरू, रॅली आणि रोड शोवर लागू शकते बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 12:20 PM2022-01-06T12:20:07+5:302022-01-06T12:20:14+5:30
Assembly Elections 2022: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची आज बैठक होत आहे. या बैठकीत गृह मंत्रालय, NITI आयोग आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी सहभागी होत आहेत.
नवी दिल्ली: देशातील वाढते कोरोना संकट आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि निवडणूक आयोगाची बैठक सुरू आहे. या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण गुरुवारी देशातील कोविड-19 च्या परिस्थितीबाबत भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना माहिती देतील. NITI आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल, मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी देखील या व्हर्चुअल बैठकीला उपस्थित आहेत. यादरम्यान आरोग्य मंत्रालयाने सादर केलेल्या अहवालावर चर्चा केली जाईल.
रॅली आणि सभांवर बंदी होणार ?
बैठकीत ओमायक्रॉनबाबत आरोग्य मंत्रालयाकडून सादर करण्यात येणाऱ्या अहवालावर निवडणूक आयोग, निती आयोगाचे सदस्य आणि कोरोनावरील टास्क फोर्सचे अध्यक्ष व्ही.के. पॉल यांचे विशेष मत घेणार आहे. या बैठकीत केंद्रीय दलाच्या तैनातीवर गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली जाईल. निवडणूक आयोगाची सलग दोन दिवस बैठक होत आहे. रॅली आणि रोड शोवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरही आयोग व्हीके पॉल यांच्याशी चर्चा करणार आहे.
कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार?
वरील मुद्द्यांसोबतच इतर ज्या बाबींवर चर्चा केली जाईल, त्यात राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांसाठी कोविड-19 शी संबंधित प्रोटोकॉल आणि नियम, उमेदवारी अर्जादरम्यान उमेदवारांसाठी कोविडशी संबंधित नियमांचे पालन, राजकीय पक्षांच्या बैठका आणि इतर मर्यादा यांचा समावेश आहे. डोअर टू डोअर प्रचार आणि मोठ्या रॅली, रोड शो, कार्यक्रम याबाबतचे नियम आणि सक्ती यासारख्या समस्यांवरही चर्चा केली जाईल. अशा स्थितीत बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.