आता दुसऱ्या राज्यातून अथवा शहरातून करता येणार मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 08:51 AM2020-02-17T08:51:40+5:302020-02-17T08:56:07+5:30
मतदारांना दुसऱ्या मतदारसंघातूनही मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोग आणि आयआयटी मद्रास एकत्रित येऊन नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे.
नवी दिल्ली - मतदानाचा हक्क हा अनेकजण बजावतात. मात्र नेमकं मतदानाच्या दिवशी काही कामानिमित्त दुसऱ्या शहरात जावं लागलं तर मतदान करता येतं नाही किंवा मग अनेकजण कामानिमित्त मुंबईत असतात पण त्यांचा मतदारसंघ हा मुंबईपासून दूर त्यांच्या गावी असतो अशावेळी त्यांनी मतदानासाठी काही कारणांमुळे जाता येत नाही. अशा सर्व मतदारांसाठी खूशखबर आहे. कारण आता मतदानाचं टेन्शन नाही. मतदारांना अशा स्थितीत त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घेतला आहे.
मतदारांना दुसऱ्या मतदारसंघातूनही मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोग आणि आयआयटी मद्रास एकत्रित येऊन नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या प्रकल्पावर काम सुरू असून प्रोटोटाईप विकसित करणं हा याचा उद्देश आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी काही दिवसांपूर्वी आयआयटी मद्राससोबत मतदानाची अशी प्रक्रिया विकसित केली जात असल्याची माहिती दिली होती.
वरिष्ठ निवडणूक उपायुक्त संदीप सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक चेनप्रणालीचा वापर त्यासाठी करण्यात येत आहे. ही सुविधा प्रत्यक्षात आल्यानंतर मतदारांना ठराविक वेळेत, विशिष्ट ठिकाणी जाऊन मतदान करता येईल. ही सुविधा सर्वत्र आणि सर्वकाळ उपलब्ध नसेल. बाहेरून मतदान याचा अर्थ घरी बसून मतदान असा नव्हे. त्यासाठी ठराविक ठिकाणी जावे लागेल. मतदाराची खात्री पटली की त्याला ई-मतपत्रिका दिली जाणार आहे. त्याच्या मदतीने मतदाराला मतदान करता येईल' अशी माहिती सक्सेना यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
गेली सत्ता अन् आमदारकी, फसला भाजपा नेत्याचा डाव; अखेर सापडला 'चोरीस' गेलेला तलाव
महिलांच्या छळवणुकीच्या तक्रारींवर आता २४ तासांत कारवाई
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत ‘एल्गार’बाबत चर्चेची शक्यता
कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांनाही नव्या वर्षात लाभ