वादग्रस्त वक्तव्यासाठी साक्षी महाराजांना निवडणूक आयोगाची नोटीस
By admin | Published: January 10, 2017 02:01 PM2017-01-10T14:01:14+5:302017-01-10T14:01:14+5:30
साक्षी महाराजांचे हे वक्तव्य म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचा ठपका निवडणूक आयोगानं ठेवला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - उन्नावचे भाजपाचे खासदार साक्षी महाराज यांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. भारताची लोकसंख्या हिंदूंमुळे वाढत नाही, तर चार बायका आणि ४0 मुले ही प्रथा पाळणाऱ्यांमुळे वाढत आहे. महिला केवळ मुले जन्माला घालण्याचे मशिन नाही, असं ते मुस्लिमांना उद्देशून म्हणाले होते. साक्षी महाराजांचे हे वक्तव्य म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचा ठपका निवडणूक आयोगानं ठेवला आहे.
निवडणूक आयोगानं साक्षी महाराजांना 11 जानेवारीपर्यंत नोटिशीला उत्तर देण्यास सांगितलं आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी साक्षी महाराजांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर निवडणूक आयोगानं साक्षी महाराजांच्या वक्तव्यासंदर्भात अहवालही मागवला होता. त्यानंतर साक्षी महाराजांना नोटीस बजावण्यात आली आहे.
(साक्षी महाराज यांचे बेताल वक्तव्य; आयोगाने मागितला अहवाल)
भाजपानं साक्षी महाराजांच्या वक्तव्यावरून हात झटकले होते. भाजपाच्या मुख्तार अब्बास नक्वींनी साक्षी महाराजांचं हे व्यक्तिगत मत असल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्यावरून मेरठमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.