तीन राज्यांमध्ये बिगुल, १६ ते २७ फेब्रुवारी या काळात मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 07:44 AM2023-01-19T07:44:54+5:302023-01-19T07:45:48+5:30

त्रिपुरा, नागालँड, मेघालयात रंगणार निवडणुकीचा संग्राम; २ मार्च रोजी हाेणार मतमोजणी

Election Commission of India declared dates for 3 states Elections polling in three states from February 16 to 27 | तीन राज्यांमध्ये बिगुल, १६ ते २७ फेब्रुवारी या काळात मतदान

तीन राज्यांमध्ये बिगुल, १६ ते २७ फेब्रुवारी या काळात मतदान

Next

सुरेश भुसारी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पूर्वोत्तर राज्यातील त्रिपुरा या राज्यात येत्या १६ फेब्रुवारीला तर मेघालय व नागालँडमध्ये येत्या २७ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका घेण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या तीन राज्यांतील मतमोजणी २ मार्च रोजी होईल. पुणे जिल्ह्यातील कसबा व चिंचवड या विधानसभा मतदारसंघांत येत्या २७ फेब्रुवारीला पोटनिवडणुका होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याने त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघातही २७ फेब्रुवारीलाच पोटनिवडणूक होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी हा निर्णय जाहीर केला. यंदाच्या वर्षी नऊ राज्यांत विधानसभा निवडणुका होणार असून, त्यातील तीन राज्यांचा निवडणूक कार्यक्रम आता घोषित झाला आहे. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या आधी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत लागणारे निकाल सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. त्रिपुरामध्ये आपली सत्ता कायम राखण्याचा तर मेघालय, नागालँडमध्ये पाया विस्तारण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. तर काँग्रेस, डावे पक्ष या तीनही राज्यांत सत्ता काबीज करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतील. या राज्यांतल्या निवडणुकांद्वारे बॅनर्जी यांचा तृणमूल पक्षही आपला ठसा उमटविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.

त्रिपुरा, मेघालय, नागालँडमधील विधानसभांची सदस्यसंख्या प्रत्येकी ६० इतकी आहे. नागालँड, मेघालय, त्रिपुरा विधानसभेची मुदत अनुक्रमे १२ मार्च, १५ मार्च व २२ मार्चला संपेल.

कसबापेठ, चिंचवडमध्ये विधानसभा पोटनिवडणुका

कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक व चिंचवड मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने या पोटनिवडणूक होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील या दोन्ही मतदारसंघांचे प्रतिनिधित्व भाजपचे नेते करीत होते. २७ फेब्रुवारीला होणाऱ्या या पोटनिवडणुकांसाठी येत्या ३१ जानेवारीला अधिसूचना जारी केली जाणार असून, ७ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 

८ फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेता येईल. तसेच आंध्र प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू येथेही विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेवर २७ फेब्रुवारीलाच पोटनिवडणुका होतील. 

लक्षद्वीपमध्ये लोकसभा पोटनिवडणूक

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राच्या बाहेरचे एकमेव खासदार मोहम्मद फैजल लक्षद्वीप मतदारसंघातून निवडून आले होते. मोहम्मद फैजल यांना फौजदारी खटल्यात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस लोकसभेच्या नैतिक समितीने घेतला आहे. या लोकसभा मतदारसंघातही येत्या २७ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे.

Web Title: Election Commission of India declared dates for 3 states Elections polling in three states from February 16 to 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.