निवडणूक आयोगाची जय्यत तयारी; लवकरच जाहीर होणार निवडणुका...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 09:01 AM2019-01-29T09:01:42+5:302019-01-29T09:06:38+5:30
निवडणूक आयोगाने असे संकेत दिले आहेत की, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात येईल. तसेच, निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होतील, अशी शक्यता आहे.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. मात्र, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. देशातील सर्व राज्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रशासकीय तयारी आणि विशेष म्हणजे अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यास निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
सर्व राज्यांतील मुख्य सचिवांना निवडणूक आयोगाने पत्र पाठविले असून यामध्ये फेब्रुवारी महिन्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या करु नका, असे सांगितले आहे. यासोबतच, निवडणूक आयोगाने असे संकेत दिले आहेत की, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर करण्यात येईल. तसेच, निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होतील, अशी शक्यता आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. तसेच, सुरक्षा व्यवस्थेबाबत गृह मंत्रालयासोबत चर्चा झाली आहे. निमलष्करी दलाची आवश्यकता पाहून किती टप्प्यात निवडणुका घेता येईल आणि कधी घ्यायच्या यासंदर्भात ठरणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक आयोगाची गृहमंत्रालयासोबत अंतिम बैठक होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसोबत काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांची सुद्धा तयारी निवडणूक आयोगाकडून सुरु आहे. गेल्या वेळप्रमाणेच लोकसभा निवडणुकांसोबत आंध्रप्रदेश, ओदिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्याच्या विधानसभा निवडणुकाही होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. चार राज्यांचा कार्यकाळ संपणार असून येथील विधानसभा निवडणुका निश्चित आहेत. दरम्यान, ज्या राज्यांमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत. त्या राज्यांतील विधानसभा निवडणुका या लोकसभा निवडणुकांसोबत झाल्यास योग्य ठरेल, असे केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाचे म्हणणे आहे.