निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांची व्हीव्हीपॅटबाबतची मागणी फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 01:49 PM2019-05-22T13:49:04+5:302019-05-22T13:50:12+5:30
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत आज बोलावण्यात आलेल्या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली - गुरुवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी वेळी सर्वप्रथम व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी करून त्याची ईव्हीएममधील मतांशी जुळणी करण्याची विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत आज बोलावण्यात आलेल्या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आता गुरुवारी नियोजित वेळापत्रकानुसारच मतमोजणी होणार आहे.
आज निवडणूक आयोगाने बोलावलेल्या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडांसह निवडणूक आयुक्त अशोक लवासा हेसुद्धा उपस्थित होते. विरोधी पक्षांची मागणी मान्य केली तर मतमोजणीसाठी दोन ते तीन दिवसांचा अवधीही लागू शकतो, याचीही चर्चा या बैठकीत झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Election Commission rejects demands of opposition parties' regarding VVPAT. More details awaited pic.twitter.com/zyxETDjWOE
— ANI (@ANI) May 22, 2019
रविवारी लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमबाबत शंका घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, मंगळवारी काँग्रेस, एसपी, टीएमसीसह तब्बल 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे धाव घेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. तसेच 23 मे रोजी मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी क्रमवारीनुसार न निवडलेल्या कुठल्याही व्हीव्हीपॅट मशीन मधील चिठ्ठ्या आणि ईव्हीएममधील मते यांची तपासणी व्हावी, अशी मागणी केली होती.
दरम्यान, स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत व्यक्त करण्यात येत असलेल्या सर्व शंका निवडणूक आयोगाने फेटाळून लावल्या आहेत.