'निवडणूक आयोगानं बुरख्यावर प्रतिबंध घातले पाहिजेत'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 09:01 AM2019-05-02T09:01:56+5:302019-05-02T09:03:29+5:30
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी बुरखा घालून बोगस मतदान केलं जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मुजफ्फरपूरः केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी बुरखा घालून बोगस मतदान केलं जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, निवडणूक आयोगानं बुरख्यावर प्रतिबंध घातले पाहिजेत. बिहारमधल्या मुजफ्फरपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना गिरीराज सिंह यांनी बुरख्याच्या आडून बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला आहे. न्यूझीलंडमध्ये बॉम्बस्फोट होतात, त्यावेळी भारतातली टुकडे-टुकडे गँग मेणबत्ती जाळतात. परंतु शेजारील श्रीलंकेत अशा प्रकारचे स्फोट झाल्यानंतर ते मेणबत्ती जाळत नाहीत, असंही गिरीराज सिंह म्हणाले आहेत.
तसेच श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं तात्काळ बुरख्यावर प्रतिबंध घातला आहेत. बुरख्याच्या आडूनच दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवले. त्यामुळे आता तरी निवडणूक आयोगानं त्यावर बंदी घालावी, अशी मागणी गिरीराज सिंह यांनी केली आहे. तत्पूर्वी शिवसेनेनंही त्यांचं मुखपत्र असलेल्या सामनातून बुरखा बंदीची भूमिका घेतली होती. त्या भूमिकेवरून शिवसेनेत दोन गट पडले.
अग्रलेखातून करण्यात आलेली बुरखाबंदीची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. तर बुरखाबंदीची शिवसेनेची भूमिका नवीन नाही. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा ती ठामपणे मांडली आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी समर्थन केले होते. त्यामुळे बुरखा बंदीवर शिवसेनेची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.