क्लीन चिटवरून निवडणूक आयोगामध्ये फूट? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 17:42 IST2019-05-18T17:39:00+5:302019-05-18T17:42:25+5:30
सतराव्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असतानाच निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त समोर आले आहे.

क्लीन चिटवरून निवडणूक आयोगामध्ये फूट? मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण
नवी दिल्ली - सतराव्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असतानाच निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना निवडणूक आचारसंहिता भंगप्रकरणामध्ये क्लीन चिट देण्यावरून हा वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगातील सर्व सदस्यांचे सर्वच बाबतीत एकमत असण्याची आवश्यकता नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी म्हटले आहे.
मोदी आणि अमित शहा यांना आचारसंहिता भंगप्रकरणी क्लीन चिट देण्यावरून निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. या वृत्तानुसार निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांना एक पत्र लिहिले असून, तीन निवडणूक आयुक्तांपैकी कुणाचेही कुठल्याही मुद्यावर वेगळे मत असल्यास संबंधित आदेशामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख असावा असे त्यांनी या पत्रात म्हटले होते. नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना क्लीन चिट देण्याच्या मुद्द्यावर अशोक लवासा हे अन्य दोन निवडणूक आयुक्तांसोबत असहमत होते. तसेच आपले विरोधी मत रेकॉर्डमध्ये नमूद करावे, असे त्यांचे मत होते. तसेच आपल्या मताप्रमाणे व्यवस्था होईपर्यंत आपण निवडणूक आयोगाच्या बैठकीत सहभागी होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.
दरम्यान, निवडणूक आयोगामध्ये मतभेद असल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. हा विवाद टाळता आला असता, असे मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे. तसेच सर्व मुख्य निवडणूक अधिकारी आणि त्यांची पथके रविवारी होणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आणि 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या तयारीत गुंतले असताना हा विवाद समोर आला आहे. सार्वजनिकरीत्या होणाऱ्या वादविवादांना माझा विरोध नाही. मात्र प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, असेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.