'...तर लोकसभेच्या निकालाला पाच दिवसांचा उशीर होईल'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 11:49 AM2019-03-30T11:49:04+5:302019-03-30T11:51:48+5:30
निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालायात माहिती
नवी दिल्ली: ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी केल्यास लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यास उशीर होईल, अशी माहिती निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला दिली. आयोगानं याबद्दलच्या व्यवहार्यतेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. किमान 50 टक्के ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी विरोधकांनी याचिकेच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीसाठी मोठ्या प्रमाणात सक्षम कर्मचारी वर्ग आवश्यक असल्याचं निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. यासाठी मोठ्या सभागृहाची आवश्यकता भासेल. अनेक राज्यांमध्ये आधीच मोठ्या सभागृहांचा प्रश्न आहे, अशा समस्या आयोगानं न्यायालयाला सांगितल्या. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीचं प्रमाण 50 टक्क्यांवर नेण्याची मागणी मान्य झाल्यास निवडणुकीला निकाल 5 दिवस उशिरा म्हणजेच 23 मे रोजी 28 मे रोजी लागेल, असं आयोगानं न्यायालयाला सांगितलं.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करुन निकाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह 21 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत. याचिकेवर आतापर्यंत झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं घेतलेली भूमिका पाहता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीच्या बाजूनं कौल मिळण्याची शक्यता आहे.