तेलंगणात KCR सरकारला मोठा झटका, निवडणूक आयोगाने रायथू बंधू योजनेला दिलेली परवानगी घेतली मागे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 13:02 IST2023-11-27T12:53:49+5:302023-11-27T13:02:54+5:30
रायथू बंधू योजनेला निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर काँग्रेसने विरोध केला होता.

तेलंगणात KCR सरकारला मोठा झटका, निवडणूक आयोगाने रायथू बंधू योजनेला दिलेली परवानगी घेतली मागे!
हैदराबाद : तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारची रायथू बंधू योजना सुरू ठेवण्याची दिलेली परवानगी मागे घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयोगाने आपल्या नवीन आदेशात म्हटले आहे की, जोपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू आहे, तोपर्यंत या योजनेंतर्गत कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत दिली जाणार नाही.
रायथू बंधू योजनेला निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर काँग्रेसने विरोध केला होता. तेलंगणाच्या केसीआर सरकारने २४ नोव्हेंबरपासून रयथू बंधू योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदानाचे पैसे वितरित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. निवडणूक आयोगानेही याला मान्यता दिली होती. मात्र, याला काँग्रेससह अन्य पक्षांनी विरोध केला होता.
यासंदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या योजनेमुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो, असा युक्तिवाद काँग्रेसने केला होता. यामुळे निवडणूक आयोगाला केसीआर सरकारला दिलेली परवानगी मागे घ्यावी लागली. दरम्यान, रायथू बंधू योजनेअंतर्गत, तेलंगणा सरकारद्वारे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात प्रति एकर पाच हजार रुपये दराने पैसे हस्तांतरित केले जातात.
या योजनेची रक्कम वर्षातून दोनदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. अशा प्रकारे वर्षभरात शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये जमा होतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या योजनेअंतर्गत तेलंगणा सरकारने आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ७० हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत आणि जवळपास ६० लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे.