नव्या १४ लाख ईव्हीएम खरेदी करण्याची निवडणूक आयोगाची इच्छा
By admin | Published: December 7, 2015 01:40 AM2015-12-07T01:40:46+5:302015-12-07T01:40:46+5:30
किमान नऊ लाखांपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) वापराची १५ वर्षांची कालमर्यादा लवकरच समाप्त होणार असल्याने आता
नवी दिल्ली : किमान नऊ लाखांपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) वापराची १५ वर्षांची कालमर्यादा लवकरच समाप्त होणार असल्याने आता ५,५११.४८ कोटी रुपये खर्चाच्या किमान १४ लाख नव्या ईव्हीएम खरेदी करण्याची निवडणूक आयोगाची इच्छा आहे.
विधि मंत्रालयाने नव्या ईव्हीएम खरेदी करण्यासाठी ‘तत्त्वत: मंजुरी’ दिलेली आहे. सध्या वापरात असलेल्या ९,३०,४३० इव्हीएम २०१५-१६ ते २०१९-२० या काळात ‘अनुपयोगी’ ठरतील. त्यामुळे २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ आणि २०१८-१९ या वित्त वर्षात अंदाजे ५,५११.४८ कोटी रुपये किमतीची १३ लाख ९५ हजार ६४८ नवी मतदान यंत्रे (बॅलटिंग युनिट) आणि ९ लाख ३० हजार ४३२ नियंत्रण यंत्रे (कंट्रोल युनिट) खरेदी करण्याचा प्रस्ताव आयोगाने विधि मंत्रालयाकडे पाठविला आहे.
एका ईव्हीएममध्ये एक नियंत्रण यंत्र आणि एक मतदान यंत्र पाच मीटर लांबीच्या केबलशी जोडलेले
असते. नियंत्रण यंत्र प्रमुख अधिकाऱ्याजवळ असते, तर मतदान यंत्र मतदान कक्षात असते, जेथे मतदार आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या समोर असलेले बटन दाबून मतदान करतो. (वृत्तसंस्था)
‘आम्हाला प्रस्ताव प्राप्त झालेला आहे आणि या प्रस्तावाला विधि मंत्रालयाने तत्त्वत: मंजुरीही दिली आहे. आता वित्त मंत्रालयातील सचिवांच्या (व्यय) अध्यक्षतेत बिगर योजना खर्चासंबंधातील समिती या प्रस्तावाला मंजुरी देईल. त्यानंतर विधिमंत्रालय त्याला अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव कॅबिनेटकडे घेऊन जाईल, असे विधि मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.