Arun Goyal : लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 09:26 PM2024-03-09T21:26:20+5:302024-03-09T21:27:15+5:30

Arun Goyal : निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

election commissioner arun goyal resigns before lok sabha elections 2024 | Arun Goyal : लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

Arun Goyal : लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

नवी दिल्ली : देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच पुढील काही आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ २०२७ पर्यंत होता. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. निवडणूक आयोगात यापूर्वीच निवडणूक आयुक्त पद रिक्त होते. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता निवडणूक आयोगात आयुक्तांची दोन पदे रिक्त आहेत. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांव्यतिरिक्त निवडणूक आयोगात आणखी दोन निवडणूक आयुक्त असतात.

आता निवडणूक यंत्रणेची संपूर्ण जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या खांद्यावर आली आहे. अरुण गोयल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत निवडणूक तयारीसाठी अनेक राज्यांचा दौरा केला होता. आता त्यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेत म्हटले आहे की, "राष्ट्रपतींनी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आहे, जो ९ मार्च २०२४ पासून प्रभावी मानला जाईल."

दरम्यान, २०२२ मध्ये अरुण गोयल यांनी दिल्लीत निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. विशेष म्हणजे  अरुण गोयल हे १९८५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी १८ नोव्हेंबर २०२२ रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि दुसऱ्याच दिवशी त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती.

Web Title: election commissioner arun goyal resigns before lok sabha elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.