निवडणूक आयुक्त निवड १५ मार्चला? आधी तयार होईल पाच नावांचे पॅनल, मग दोन नावांची निश्चिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 05:44 AM2024-03-11T05:44:11+5:302024-03-11T05:45:08+5:30
निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी राजीनाम्यानंतर नव्या आयुक्तांची निवड १५ मार्च होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : निवडणूक आयुक्त अरूण गोयल यांनी राजीनाम्यानंतर नव्या आयुक्तांची निवड १५ मार्च होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेतील समितीची त्यासाठी बैठक होणार आहे. गोयल यांच्या राजीनाम्यासह यापूर्वी अनुप चंद्र पांडे फेब्रुवारीमध्ये निवृत्त झाले होते. त्यामुळे सध्या तीन सदस्यीय आयोगात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे एकमेव सदस्य आहेत.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी असताना शुक्रवारी अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी त्यांचा राजीनामा स्वीकारला. केंद्रीय कायदेमंत्रालयाने त्याबाबतची घोषणाही केली. नव्या निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वातील समिती ५-५ नावांचे पॅनल तयार करतील. त्यानंतर पंतप्रधान यांच्यासह एक केंद्रीय मंत्री, लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांची समिती दोन आयुक्तांची नाव निश्चित करेल. त्यानुसार ही बैठक १३ वा १४ मार्च रोजी होऊन १५ मार्चला घोषणा होण्याची शक्यता आहे.