सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 02:48 PM2024-06-03T14:48:30+5:302024-06-03T14:51:40+5:30

Election Commissioner Rajiv Kumar PC News: सुरत, इंदूर लोकसभा निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली, याबाबत आयुक्त राजीव कुमार यांनी प्रतिक्रिया दिली.

election commissioner rajiv kumar reaction on what if all candidates take back application from election | सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट

सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट

Election Commissioner Rajiv Kumar PC News: लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. एक्झिट पोलच्या आकड्यांवरून इंडिया आघाडी आणि एनडीएचे नेते अनेक दावे-प्रतिदावे करत आहेत. निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच, केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. 

आपण मतदानाचा विश्वविक्रम केला आहे. महिला मतदारांची संख्या महत्त्वाची होती. येत्या काळात तरुण या मतदानातून प्रेरणा घेतील. ६४ कोटींहून अधिक लोकांनी मतदान केले. ३१ कोटींहून अधिक महिला मतदारांनी मतदान केले. मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत बळकट आहे. निवडणूक उत्साहात पार पडली आहे. आता आम्ही पारदर्शीपणे मतमोजणीला आणि निकालाच्या दिवसाला सामोरे जात आहोत. कुणाकडून काहीही चुकीचे करण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही कुणाचीही गय करणार नाही. लोकशाहीची मूळे बळकट करण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो, असे राजीव कुमार यांनी म्हटले आहे. 

सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार नोटामध्ये निवडणूक का नाही

सुरत आणि इंदूर लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वच उमेदवारांनी माघार घेतली होती. त्यानंतर त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक बिनविरोध झाली. यामुळे त्या ठिकाणी नोटा आणि उमेदवार यांच्यात लढत झाली पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया देशभरातून व्यक्त करण्यात आली होती. यासंदर्भात पत्रकार परिषदेत आयुक्त राजीव कुमार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना, आमची धारणा आहे की, सर्वच ठिकाणी मतदान झाले पाहिजे. परंतु निवडणुकीदरम्यान उमदेवार आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत असेल तर आम्ही काय करु शकतो? उमेदवारांनी स्वेच्छेने माघार घेतल्यामुळे आम्ही काहीच करु शकत नाही. परंतु उमेदवारावर कोणाचा दबाब असेल तर आम्ही काही भूमिका घेऊ शकतो, असे राजीव कुमार म्हणाले.

दरम्यान, इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आयोगाने निवडणूक काळात झालेल्या गोंधळावरून होत असलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले आहे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या 'लापता जेंटलमैन वापस आ गए' मीम्सवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिले आहे. आम्ही कधीच बेपत्ता झालो नव्हतो, असे उत्तर राजीव कुमार यांनी विरोधकांना दिले आहे. ऐन उन्हाच्या कडाक्यात निवडणुका झाल्याचेही आयोगाने मान्य केले. पुढील लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत संपविण्यात येणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. 

 

Web Title: election commissioner rajiv kumar reaction on what if all candidates take back application from election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.