जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी घेणार? निवडणूक आयुक्तांनी थेट वेळ सांगितली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 03:48 PM2023-10-09T15:48:29+5:302023-10-09T15:53:13+5:30
पाच राज्यांचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यावेळी जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांबाबत प्रश्न विचारण्यात आला.
Jammu-Kashmir Assembly Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये या ५ राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. छत्तीसगडमध्ये २ टप्प्यात, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणामध्ये १ टप्प्यात मतदान होणार आहे. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांबाबत प्रश्न विचारण्यात आला.
या ५ राज्यांच्या निवडणुकीचे निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी लागणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. तसेच निवडणूक आयोगाने सर्व ५ राज्यांचा दौरा केला. सरकारी संस्था, राज्य सरकार यांच्यासोबत बैठक घेतली. या ५ राज्यात ६७९ विधानसभा जागा आहेत. त्यात १६.१४ कोटीहून अधिक मतदार आहेत. यामध्ये ८.२ कोटी पुरुष मतदार तर ७.८ कोटी महिला मतदार आहेत. या राज्यांमध्ये ६० लाख असे मतदार आहेत जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका कधी घेणार?
निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीबाबत विचारण्यात आले. यावर, सुरक्षा आणि अन्य निवडणुका लक्षात घेऊन योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. सध्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर पुढील वर्षीच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत जम्मू-काश्मीरच्या जनतेला विधानसभा निवडणुकीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच लडाख स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिलसाठी (कारगिल) ४ ऑक्टोबर रोजी निवडणुका झाल्या, ज्याचे निकाल ८ सप्टेंबर रोजी आले. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने बाजी मारली आहे. २६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि एनसीने एक तृतीयांश जागांवर कब्जा केला. येथे भाजपला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या १७ पैकी फक्त दोन उमेदवार विजयी होऊ शकले. जनतेने भाजपला नाकारल्याची टीका विरोधकांनी केली.