"आम्ही कारवाई करायला सुरुवात केली तर..."; भाजप उमेदवाराला निवडणूक आयोगाने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:28 IST2025-01-07T17:26:42+5:302025-01-07T17:28:56+5:30
Delhi Election: निवडणूक आयुक्तांनी भाजप उमेदावाराने महिलांबाबत केलेल्या अपमानजक वक्तव्याबाबत इशारा दिला आहे.

"आम्ही कारवाई करायला सुरुवात केली तर..."; भाजप उमेदवाराला निवडणूक आयोगाने दिला इशारा
Election Commission : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून देशाच्या राजधानीत प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. भाजप, आम आदमी पक्ष यांच्यात मुख्य लढत होणार आहे. अशातच भाजपाचे माजी खासदार आणि कालकाजी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे दिल्लीतलं राजकीय वातावरण तापलं आहे. रमेश बिधुरी यांनी काँग्रेसच्या सचिव प्रियांका गांधी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याबाबत अश्लाघ्य विधाने केली होती. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने भाष्य केलं आहे.
मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत घेत दिल्ली निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला त्याचा निकाल लागणार असल्याचे सांगतिले. यावेळी त्यांना रमेश बिधुरी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत प्रश्नही विचारण्यात आले. निवडणूक आयुक्तांनी प्रियंका गांधी आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावरील विधानांचा निषेध करत त्या लज्जास्पद असल्याचे म्हटलं.
"महिलांबद्दल कुणी काही चुकीचं बोललं तर त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. अशा घाणेरड्या कमेंट करू नयेत. आम्ही अत्यंत कठोर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आम्ही सध्या आमच्या जिल्हा अधिकाऱ्याला फौजदारी कारवाई करण्यापासून रोखत आहोत. आम्ही फौजदारी कारवाई करू लागलो तर चांगले होणार नाही. याबाबत मतदारांना निर्णय घेऊ द्या. मी इशारा देत आहे. मुलांचा अजिबात वापर करु नका. एकीकडे सबलीकरण होत आहे तर दुसरीकडे महिलांना असे बोलले जात आहे. गरज भासल्यास आम्ही कारवाई करू," असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं.
भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी रोहिणीतील भाजपच्या परिवर्तन रॅलीत बोलताना मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. "आतिशी आधी मार्लेना होत्या, आता त्या सिंह झाल्या आहेत. त्यांनी स्वतःचा बापच बदलला. आतिशी यांच्या वडिलांनी अफझल गुरूची फाशी रोखण्याचा प्रयत्न केला होता. दहशतवादी अफझल गुरूमुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला होता," असं रमेश बिधुरी म्हणाले. अतिशी यांच्या वडिलांनी अफझल गुरूचे समर्थन केले होते आणि त्यांनी अफझल गुरूचा बचाव केल्याचा आरोपही बिधुरी यांनी केला.
दरम्यान, त्याआधी रमेश बिधुरी यांनी काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. मी निवडून आलो तर प्रियांका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनवेन, असे वक्तव्य बिधुरींनी केले होते. टीका झाल्यानंतर बिधुरी यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. माझ्या शब्दांमुळे जर माता-भगिनींना किंवा कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं बिधुरी म्हणाले.