निवडणुक आयोगाच्या दणक्याने चौकीदारांची डोकेदुखी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 12:29 PM2019-04-05T12:29:02+5:302019-04-05T12:33:51+5:30
वारंवार होणाऱ्या आचारसंहिता भंगामुळे निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या प्रकरणी नोटीस देऊन उत्तर मागवले आहे. मोदींनी दूरदर्शन वाहिनीवर केलेलं भाषण असो किंवा नमो टीव्हीवर भाजपचा सर्रास होणारा प्रचार असो.
मुंबई – देशात आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगाने सुरू केलेलं सर्जिकल स्ट्राईक भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची डोकेदुखी ठरत आहे. वारंवार होणाऱ्या आचारसंहिता भंगामुळे निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या प्रकरणी नोटीस देऊन उत्तर मागवले आहे. मोदींनी दूरदर्शन वाहिनीवर केलेलं भाषण असो किंवा नमो टीव्हीवर भाजपचा सर्रास होणारा प्रचार असो.
लोकसभा निवडणुक आचारसंहिता लागू झाल्यापासून भाजपकडून वेळोवेळी आचारसंहिता भंग करण्यात येत असल्याचे आरोप विरोधकांनी केले आहे. ३१ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मै भी चौकीदार" या मोहिमेसाठी दूरदर्शन वाहिनीवर दीड तास भाषण केले. त्यानंतर करण्यात आलेल्या तक्रारीनंतर निवडणुक आयोगाने आचारसंहिता भंग झाल्याचं ठपका ठेवला आहे. त्यामुळे भाजपची " मै भी चौकीदार" मोहीम अडचणीत आली. निवडणुक आयोगाची परवानगी न घेताच हा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकण्यात आला होता. व्हिडिओमध्ये जवानांचा वापर करण्यात आला असल्याने निवडणुक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप वेळोवेळी आचारसंहिता भंग करत असल्याचे आरोप करत विरोधकांनी टीका सुरू केली आहे. दुसरीकडे निवडणुका जाहीर होताच 'नमो टीव्ही' चॅनेल सर्वत्र दाखवले जात आहे. आचारसंहिता लागू असून सुद्धा सर्रासपणे यावर मोदींचे भाषण व भाजपचा प्रचार केला जात आहे. यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्याने निवडणूक आयोगाने याप्रकरणी सूचना प्रसारण मंत्रालयला नोटीस बजावली आहे.
भाजपकडून आचारसंहितेचा भंग होत असताना निवडणूक आयोगाकडून मात्र नोटीस देण्याव्यातिरिक्त कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सत्ता आल्यावर निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू, असे म्हटले नसेल ना ?