निवडणूक आयोगाचे कार्यालय भाजपच्या मुख्यालयात स्थलांतर केले पाहिजे ; आप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 12:40 PM2019-05-19T12:40:53+5:302019-05-19T12:45:49+5:30
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणातील वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगात विरोधकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दिलेल्या क्लीन चीटवरुन निवडणूक आयोगात मतभेद असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून विरोधकांनी आता भाजपबरोबर निवडणूक आयोगावर सुद्धा निशाना साधला आहे. निवडणूक आयोगाचे कार्यालय हे भाजपच्या मुख्यालयात स्थलांतर केले पाहिजे अशी टीका आपचे खासदार संजय सिंह यांनी केली आहे. पत्रकारांशी सवांद साधताना ते बोलत होते.
याआधी राजकीय पक्ष निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत होते. मात्र, निवडणुक आयुक्त अशोक अवासा यांच्या नाराजीनंतर स्पष्ट झाले आहे की, निवडणूक आयोग निपक्ष:पणे काम करत नाही. निवडणूक आयोग भाजपचा एजंट असल्यासारखे वागत असल्याचे आरोप खासदार सिंह यांनी केला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणातील वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगात विरोधकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना क्लिन चीट दिली होती.त्यांनतर, निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र पाठवून ही नाराजी व्यक्त केल्याने निवडणूक आयोगातील मतभेद समोर आले. त्यामुळे निवडणूक आयोग पक्षपातीपणाने वागत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.