हिमाचलमध्ये निवडणुकीचे बिगुल; एकाच दिवशी सर्व जागांवर मतदान; गुजरातची घोषणा मात्र लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 06:21 AM2022-10-15T06:21:01+5:302022-10-15T06:21:47+5:30
गुजरात व हिमाचल प्रदेशची निवडणूक एकाचवेळी होईल, असा कयास बांधला जात होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: भाजपने हिमाचल प्रदेश राखण्यासाठी तर काँग्रेसने येथील सरकार उलटून टाकण्यासाठी कंबर कसली असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने येथील विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली. राज्यात एकाच टप्प्यात १२ नोव्हेंबरला होईल तर मतमोजणी ८ डिसेंबरला होईल. राज्यात निवडणूक आचारसंहितेचा अंमल सुरू झाला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये एकूण ५५ लाख मतदार आहेत तर ६७ हजार मतदार हे टपालाद्वारे मतदान करणारे आहेत. या राज्यामध्ये एकूण विधानसभा मतदारसंघांची संख्या ६८ असून, त्यापैकी १७ अनुसूचित जातीसाठी तर ३ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
गुजरातची निवडणूक का नाही?
- गुजरात व हिमाचल प्रदेशची निवडणूक एकाचवेळी होईल, असा कयास बांधला जात होता. हिमाचल प्रदेश व गुजरात विधानसभांची मुदत संपण्याच्या कालावधीत ४० दिवसांचा फरक आहे. हिमाचल विधानसभेची मुदत येत्या ८ जानेवारी २०२३ रोजी संपणार आहे.
- गुजरात विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ रोजी संपणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हिवाळ्यात लोकांना मतदान करण्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने हिमाचल प्रदेशची निवडणूक लवकर घेण्यात येत असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार व निवडणूक आयुक्त अनुपकुमार पांडेय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शंभरी पार केलेले ११८४ मतदार
हिमाचल प्रदेशमध्ये १०० वर्षे पूर्ण केलेले १,१८४ मतदार असून, या मतदारांचा निवडणूक आयोगाने सन्मान केला. १ लाख २२ हजार मतदार ८० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. या मतदारांना तसेच दिव्यांगांना घरी बसून मतदानाचा हक्क बजावण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गुप्तता राखण्यासाठी या प्रक्रियेचा व्हिडीओ काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. १ लाख ८६ हजार मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
मतदान नि:पक्षपाती पूर्ण व्हावे, यासाठी आयोगाने सर्व व्यवस्था केली असून, लोकांना सी-व्हीजिल ॲपद्वारे व्हिडीओ करून निवडणूक गैरप्रकाराच्या घटनांची माहिती देता येईल. तक्रार केल्यापासून ९० मिनिटांत कारवाई करण्यात येईल. - राजीवकुमार, मुख्य निवडणूक आयुक्त
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"