बरेलीची बर्फी कोणाचे तोंड करणार गोड? ‘झुमका गिरा रे’ गाण्यामुळे देशात प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 01:09 PM2022-02-13T13:09:24+5:302022-02-13T13:10:21+5:30
बरेली प्रदेशच्या साधारण मध्यावर असलेला हा जिल्हा. राज्याची राजधानी असलेला लखनौ आणि देशाची राजधानी असलेली दिल्ली यांच्याबरोबर मध्यावर हे शहर वसले आहे.
मनोज मुळ्ये -
बरेली (उत्तर प्रदेश) : ‘झुमका गिरा रे’ म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेल्या बरेलीतील सत्तेची बर्फी यावेळी कोणाचे तोंड गोड करणार, याची मोठी उत्सुकता आहे. गत निवडणुकीत या जिल्ह्यातील नऊच्या नऊ जागा जिंकणाऱ्या भाजपने ही सत्ता राखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र माेदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे प्रदेश स्तरावरील नेते सातत्याने या भागात प्रचार करत आहेत.
बरेली प्रदेशच्या साधारण मध्यावर असलेला हा जिल्हा. राज्याची राजधानी असलेला लखनौ आणि देशाची राजधानी असलेली दिल्ली यांच्याबरोबर मध्यावर हे शहर वसले आहे.
झुमका गिरा रे या गाण्यामुळे करमणुकीच्या जगात प्रसिद्धी पावलेला हा भाग बर्फीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. १९९० पूर्वी औद्योगिकीकरणामुळे हा भाग संपन्न झाला. मात्र, ९० नंतर अनेक कारखाने बंद झाले. ऊस, गहू, भात आणि कडधान्याची लागवड या भागात खूप आहे.
हिंदूबहुल वस्ती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या सक्रिय सहभागामुळे १९८५ सालच्या विधानसभा या निवडणुकांपासून हा भाग सतत भाजपच्याच ताब्यात राहिला आहे. त्यामुळे याहीवेळेस या नऊही जागांवरील ताबा कायम ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
...हम उनको लाएंगे
यावेळेच्या निवडणुकांमध्ये ‘वो राम को लाये है, हम उनको लाएंगे’ हे वाक्य इथल्या मतदारांना अधिक आकर्षित करणारे ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी दुपारच्या सत्रात बरेलीमध्ये व्हर्च्युअल रॅली होती. शहरातच सायंकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रोड शोच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला. त्याचवेळी भाेजीपूर भागात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारात भाग घेतला.