गुजरातेत इलेक्शन? काही माहितीच नाही, या जिल्ह्यातील लोकांची अशीही व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 10:42 AM2022-11-28T10:42:12+5:302022-11-28T10:42:45+5:30

देशाला मीठ पुरविणाऱ्या जिल्ह्याची स्थिती

Election in Gujarat? There is no information of kharaghoda district | गुजरातेत इलेक्शन? काही माहितीच नाही, या जिल्ह्यातील लोकांची अशीही व्यथा

गुजरातेत इलेक्शन? काही माहितीच नाही, या जिल्ह्यातील लोकांची अशीही व्यथा

googlenewsNext

रमाकांत पाटील

पाटली (सुरेंद्रनगर) : देशात ५-जी सेवा सर्वप्रथम गुजरातमध्ये सुरू झाली असली तरी आणि ‘गुजरात मॉडेल’ची कितीही चर्चा सुरू असली तरी येथील मीठ उत्पादक आगरियांची अवस्था मात्र अतिशय दयनीय आहे. गुजरात विधानसभेसाठी मतदान अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना ‘चुटणी क्यारे छे, अमने नई खबर...’ अशा प्रतिक्रिया खाराघोडा या भागातील मिठाच्या रणात फिरताना ऐकायला मिळाल्या.

सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पाटली गावच्या पुढे शेकडो एकर क्षेत्रात मिठाचे रण आहे. देशात लागणाऱ्या एकूण मिठाचे २५ टक्के मीठ या भागात तयार होते. या वस्तींमध्ये कुठलीही सुविधा नाही.  शिक्षणासाठी हंगामी शाळा सुरू असल्या तरी त्या नावालाच आहेत. या भागात आठ दिवसांतून टँकरने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे आहे त्या भांड्यामध्ये पाणी भरतात आणि ते पाणी आठ दिवस पुरविण्यासाठी त्यांची कसरत असते. आरोग्य सेवा तर नाहीच, अशा एक ना अनेक प्रश्नांना सामोरे जात हे आगरिक मीठ उत्पादनासाठी गुंतले आहेत.

जेवणाच्या बदल्यात मतदान अन् रक्कम
nसुरेंद्रनगर जिल्ह्यातील दसाडा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात १० हजार आगरिक असून, त्यांना मतदानाच्या दिवशी ट्रक अथवा इतर वाहनाने राजकीय पक्षाचे नेते मतदान केंद्रावर आणतात. 
nत्यांना बुडीत मजुरीची रक्कम, तसेच जेवण दिले जाते आणि कसे व कुठे मतदान करावे त्याबाबत मार्गदर्शन करून त्यांच्याकडून मतदान करून घेतले जाते, अशी माहिती या भागातील जाणकार लक्ष्मीकांतभाई चव्हाण यांनी दिली.

निवडणुकीचा कुठलाही मागमूस नाही
गुजरात निवडणुकीचा कुठलाही मागमूस तेथे दिसून आला नाही.  खोडाभाई वनाभाई ठाकूर यांनी सांगितले,  ‘‘निवडणूक कधी आहे ते आपल्याला माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची पत्नी सीताबेन यांनाही निवडणुकीची तारीख माहीत नाही. एवढेच नव्हे तर आपल्या भागातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांबाबत व मुख्यमंत्र्यांचे नावही त्यांना माहीत नाही.

Web Title: Election in Gujarat? There is no information of kharaghoda district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.