जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच एक संविधान, एक तिरंग्याखाली मतदान…,अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 02:14 PM2024-09-07T14:14:44+5:302024-09-07T14:26:43+5:30

Jammu Kashmir Assembly Election 2024 : एका कार्यक्रमात अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दहशतवाद, पाकिस्तान आणि विरोधी पक्षांवरही जोरदार हल्लाबोल केला.

Election in Jammu and Kashmir ‘historic’ as first time it will be held under national flag and Constitution: Amit Shah | जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच एक संविधान, एक तिरंग्याखाली मतदान…,अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच एक संविधान, एक तिरंग्याखाली मतदान…,अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

Jammu Kashmir Assembly Election 2024 :जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी केली आहे. याच पार्श्वभूमीवर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र प्रसिद्ध केले. यानंतर आज एका कार्यक्रमात अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दहशतवाद, पाकिस्तान आणि विरोधी पक्षांवरही जोरदार हल्लाबोल केला.

जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच भारतीय राज्यघटनेनुसार निवडणुका होत आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. स्वतंत्र भारतात पहिल्यादाच याठिकाणी तिरंग्या झेंड्याखाली मतदान होत आहे, असे अमित शाह म्हणाले. तसेच, अमित शाह यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पक्षावरही जोरदार हल्लाबोल केला. कलम ३७० हटवल्यानंतर ७० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमधील लोकांना त्यांचे अधिकार मिळाले आहेत. पण, या दोन्ही पक्षांना तुमचा हक्क पुन्हा हिसकावून घ्यायचा आहे. हे असे असावे का? असा सवाल अमित शाह यांनी केला. यावेळी त्यांनी पाकिस्तानला आव्हानही दिले. जोपर्यंत येथे शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही, असे अमित शाह म्हणाले.

याचबरोबर, दगडफेक करणारे आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील असा तुरुंगात असलेल्या लोकांच्या मुद्द्यावरून सुद्धा अमित शहा यांनी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसवरही जोरदार टीका केली. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला तुरुंगात असलेल्या लोकांची सुटका करून खोऱ्यातील वातावरण पुन्हा बिघडवायचे आहे, असे अमित शाह म्हणाले. तसेच, विरोधकांना जम्मू, पुंछ, राजौरी सारख्या भागात पुन्हा शांतता भंग करायची आहे. पण इथली जनता हे सगळं होऊ देतील का? असा सवाल अमित शाह यांनी  केला.

जम्मू-काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याच्या विरोधकांच्या आश्वासनावरही अमित शाह यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेते मी आधीच सांगितलेल्या गोष्टीची पुनरावृत्ती करत आहेत. त्यांनी ५ आणि ६ ऑगस्ट रोजी माझे भाषण ऐकावे. निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळेल, असे मी म्हटले होते. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस दोन्ही पक्ष म्हणतात की आम्ही जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देऊ. पण, जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा परत कसा देणार? केवळ भारत सरकारच राज्याचा दर्जा देऊ शकते, असे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, आज आमच्या पक्षाचे सरकार जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात येथे एम्स, आयआयटी आणि महाविद्यालये दिली. आज जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद नष्ट केला जात आहे. मोदी सरकारच्या काळातच हे शक्य झाले, असेही अमित शाह म्हणाले.

काय आहेत भाजपच्या संकल्पपत्रात?
दरम्यान, काल (दि.६) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र प्रसिद्ध केले होते. यामध्ये कलम ३७० कधीही परत लागू होणार नाही, यासह ५ लाख रोजगार, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दोन मोफत गॅस सिलिंडर, १०वीच्या विद्यार्थ्यांना टॅब्लेट आणि लॅपटॉप इत्यादी आश्वासने भाजपने जम्मू-काश्मीरच्या जनतेला दिली आहेत. तसेच, पंतप्रधान सन्मान निधीतून १० हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात येतील. सध्याच्या ६ हजार रुपयांमध्ये आणखी ४ हजार रुपये जोडण्यात येतील. शेतीच्या कामांसाठी वीजदरांमध्ये ५० टक्के कपात केली जाईल. अटल आवास योजनेंतर्गत भूमिहीन लोकांना ५ मरला म्हणजे सुमारे १,३६१ चौरस फूट जमीन देऊ, अशी आश्वासने भाजपने शेतकऱ्यांना दिली आहेत.

Web Title: Election in Jammu and Kashmir ‘historic’ as first time it will be held under national flag and Constitution: Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.