डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 05:37 AM2024-11-28T05:37:05+5:302024-11-28T05:37:33+5:30
सरचिटणीस विनोद तावडे यांना बिहार आणि उत्तर प्रदेशचे निरीक्षक बनविण्यात आले आहे.
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या नवीन अध्यक्षांची निवड पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये केली जाणार आहे. संघटनेची निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी यासाठी पक्षाने निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत.
भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या निवडणुकीसाठी बुधवारी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. सरचिटणीस विनोद तावडे यांना बिहार आणि उत्तर प्रदेशचे निरीक्षक बनविण्यात आले आहे. अरुण सिंग यांच्याकडे महाराष्ट्र, गोवा, दमण, दादरा नगर हवेलीची जबाबदारी देण्यात आली आहे. सरचिटणीस सुनील बन्सल यांच्यावर पश्चिम बंगाल, हरयाणा, आसाम आणि झारखंडची जबाबदारी देण्यात आली आहे. तरुण चुघ केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक आणि लक्षद्वीपचे निरीक्षक असतील. शिवप्रकाश यांच्याकडे मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची जबाबदारी देण्यात आली आहे. राधामोहन दास राजस्थान, पंजाब, चंडीगड आणि गुजरातचे निरीक्षक असतील. श्रीकांत शर्मा यांना उत्तराखंडचे निरीक्षक बनविण्यात आले आहे.
निरीक्षकांची मुख्य जबाबदारी काय?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक डिसेंबरमध्ये होणे आहे. तत्पूर्वी जिल्ह्यापासून राज्य पातळीपर्यंतच्या सर्व निवडणुका संपन्न व्हायला हव्यात. यासाठी निरीक्षक नेमण्यात आले आहेत. भाजपची अंतर्गत रचना मजबूत आणि पारदर्शक राहावी यासाठी निवडणुकीची प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष पद्धतीने संपन्न करणे निरीक्षकांची मुख्य जबाबदारी आहे.