Election Result : निवडणूक निकालानंतर कुणीही विजयी मिरवणुका काढू नका, भाजपाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 12:21 PM2021-04-27T12:21:08+5:302021-04-27T12:22:33+5:30
Election Result : निवडणूक आयोगाने आता महत्वाचा निर्णय घेतला असून २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारे विजयी जल्लोष करता येणार नाही.
नवी दिल्ली - गेल्या महिनाभरापासून देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. वर्षाच्या सुरुवातीला देशातील स्थिती नियंत्रणात होती. मात्र, चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्षांनी मोठमोठ्या सभा घेतल्या. यावरून मद्रास उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाची चांगलीच कानउघाडणी केली आहे. तसेच, 2 मे रोजी निकालाच्या दिवशी काय नियोजन आहे, असा सवालही न्यायालयाने विचारला आहे.
निवडणूक आयोगाने आता महत्वाचा निर्णय घेतला असून २ मे रोजी निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी आणली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारे विजयी जल्लोष करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं भाजपने स्वागत केलं असून विधानसभा निवडणुका पार पडलेल्या सर्वच राज्यातील प्रमुखांना निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सभी राज्यों की भाजपा इकाइयाँ विधानसभा चुनावों और उप चुनावों के परिणामों के दिन चुनाव आयोग के आदेश और कोविड सम्बन्धी प्रोटोकालों का अक्षरशः पालन करेंगी।मेरा सभी कार्यकर्ताओं और देशवासियों से आग्रह है कि अभी अधिक से अधिक स्वास्थ्य सम्बंधी नियमों का पालन करे और जागरूकता बढ़ायें।
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) April 27, 2021
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. 2 मे रोजी निकाल असलेल्या सर्वच राज्यात आणि पोटनिवडणुकांच्या ठिकाणीही कुणीही विजयी सभा, मिरवणूक काढू नये. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे आणि कोरोना प्रतिंबंधक उपाययोजनांचे पालन करावे, अशा सूचना सर्वच राज्यांच्या प्रमुखांना दिल्याचे जगत प्रकाश नड्डा यांनी सागितले.
लवकरच आदेश निघणार
2 मे रोजी चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर विजयी मिरवणुका काढू नका, अशी सूचना निवडणूक आयोगानं केली आहे. निवडणूक आयोगानं मिरवणुकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लवकरच आयोगाकडून आदेश काढण्यात येणार आहे.
न्यायालय निवडणूक आयोगावर संतापले
राजकीय पक्षांना प्रचारसभा घेण्यासाठी परवानगी कशी दिलीत, असा सवाल मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीब बॅनर्जींनी सुनावणीदरम्यान उपस्थित केला. देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. तुमच्या अधिकाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशा शब्दांत न्यायालयानं संताप व्यक्त केला. न्यायालयाच्या आदेशानंतरही निवडणूक प्रचारसभांमध्ये फेसमास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम यांचे नियम धाब्यावर बसवले गेले, याबद्दल न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली.
मतमोजणीवेळी काय उपाययोजना करणार असा सवाल
निवडणूक प्रचारसभा सुरू असताना तुम्ही कोणत्या जगात होतात, असा सवाल न्यायमूर्तींनी विचारला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीवेळी काय उपाययोजना करणार आहात, असा प्रश्नदेखील न्यायाधीशांनी उपस्थित केला. मतमोजणीवेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीची ब्लूप्रिंट सादर करा. अन्यथा २ मे रोजी होणारी मतमोजणी रोखू, असा गर्भित इशारादेखील त्यांनी दिला.