पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा संसद अधिवेशनावर होणार परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 02:40 PM2023-11-19T14:40:31+5:302023-11-19T14:40:52+5:30
भारतीय दंड संहिता विधेयक होणार पारित
संजय शर्मा
नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा चार डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर स्पष्ट परिणाम दिसणार आहे. महुआ मोईत्रा, नरेंद्र सिंह तोमर यांच्या मुलाचा व्हिडीओ आदी मुद्यांवर विरोधी पक्ष आक्रमक होतील, अशी शक्यता आहे.
पाचपैकी तीन राज्यांत भाजप व काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा मुलगा देवेंद्र तोमर याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे विरोधी पक्ष केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करू शकतात.
nतृणमूल काँग्रेसच्या खा. महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेच्या नैतिकता समितीने कारवाई करण्याची शिफारस केली आहे. त्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला निर्णय घेणार आहेत.
nविरोधी पक्ष या मुद्यावरही हंगामा करू शकतात. याबरोबरच संसदेत बसपा खा. दानिश अली यांच्याबाबत भाजप खा. रमेश विधुडी यांनी केलेल्या टिप्पणीवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. विरोधक हा मुद्दाही उचलून धरू शकतात.
बृजभूषण यांची क्लीन चिट गाजणार
महिला कुस्तीपटूंशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात भाजपचे खा. बृजभूषण शरण सिंह यांना क्लीन चिट देण्याचे प्रकरणही गाजण्याची शक्यता आहे. सरकारने लोकसभेत सादर केलेले भारतीय दंड संहिता विधेयक सरकार लोकसभा व राज्यसभेत पारित करून घेईल. भारतीय पिनल कोडच्या जागी भारतीय न्याय संहिता २०२३, सीआरपीसीच्या जागी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ व एव्हिडन्स ॲक्टच्या जागी भारतीय साक्ष विधेयक २०२३ला गृह मंत्रालयाच्या संसदीय समितीने यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे. आता संसदेच्या दोन्ही सभागृहांत संसदेच्या याच अधिवेशनात तिन्ही विधेयके पारित करण्यात येतील.