निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर पंजाबमध्ये काँंग्रेससोबत
By admin | Published: February 14, 2016 01:40 PM2016-02-14T13:40:36+5:302016-02-14T13:40:36+5:30
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर पुढच्यावर्षी होणा-या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मदत करणार आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. १४ - लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर पुढच्यावर्षी होणा-या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मदत करणार आहेत.
पंजाब निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी प्रशांत किशोर यांना सहभागी करुन घेण्यास अखिल भारतीय काँग्रेस समितीने मंजुरी दिल्याचे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितले. सध्या प्रशांत किशोर नितीश कुमार यांच्या सल्लागाराची जबाबदारी संभाळत आहेत.
पंजाबमधील राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रशांत किशोर अलीकडेच चंदीगडला गेले होते. तिथे त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांची भेट घेतली. किशोर यांची काम करण्याची जी स्टाईल आहे त्यानुसार पंजाबमध्ये काँग्रेस सोशल मिडीया सेल सुरु करणार आहे.
लोकसभा निवडणुकीत मोदींची यशस्वी ठरलेली 'चाय पे चर्चा' ही कल्पना प्रशांत किशोर यांचीच होती. २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दल-भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अशी त्रिशंकू लढत होणार आहे.
शिरोमणी अकाली दल-भाजप आघाडीच्या कारभारावर असलेल्या नाराजीमुळे काँग्रेस आणि आपमध्येच मुख्य लढत होईल. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये आपला चार जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे विधानसभेला आप सर्वच्या सर्व ११७ जागा लढवू शकते.