UP Election : ... तर उत्तर प्रदेश सोडून निघून जाईन, मुनव्वर राणांचा थेट औवेसींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 07:06 PM2021-07-17T19:06:14+5:302021-07-17T19:07:19+5:30
UP Election : उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षात विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून चांगलीच मोर्चेबांधणी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही येथे खास लक्ष आहे. त्यात, एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसी यांनी येथे भाजपला चॅलेंज केंल आहे.
लखनौ - एमआयआयचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यावर नेहमीच भाजपाची बी टीम असल्याचा आरोप होतो. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांवेळीही त्यांच्यावर भाजपाच्या सोयीनं राजकारण करणारा पक्ष असल्याची टीका तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आली होती. आता, प्रसिद्ध उर्दू शायर आणि उत्तर प्रदेशचे नामवंत व्यक्ती असलेल्या मुन्नवर राणा यांनीही असदुद्दीन औवेसी यांना अनुसरुन मोठी घोषणाच केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली.
उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षात विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून चांगलीच मोर्चेबांधणी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही येथे खास लक्ष आहे. त्यात, एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसी यांनी येथे भाजपला चॅलेंज केंल आहे. त्यानंतर, भाजपला 300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. आता, या वादात प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी उडी घेतली आहे.
भाजपा आणि एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे असे दोन कुस्पीपटू आहेत जे केवळ लोकांना दाखवण्यासाठी एकमेकांविरोधात लढत आहेत. मतांचं ध्रुवीकरण व्हावं आणि त्याचा फायदा भाजपाला व्हावा असा या दोघांचा डाव असल्याचं, मुनव्वर राणा यांनी म्हटलं आहे. तसेच, ओवैसींमुळे योगी आदित्यनाथ पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मी राज्य सोडून निघून जाईन, असं मुनव्वर राणा म्हणाले आहेत.
औवेसींचा योगी सरकारवर निशाणा
ओवैसी यांनी उत्तर प्रदेशमध्ये लागू करण्यात आलेल्या उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण २०२१-२०३० वरुन टीका केली होती. “डिसेंबर २०२०मध्ये केंद्रातील मोदी सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं की जन्मदर (Total Fertility Rate) घटू लागल्यामुळे देशात दोन अपत्य धोरण राबवता येणार नाही. पण, दुसरीकडे योगी सरकार मात्र त्यालाच विरोध करत आहे. हा प्रस्ताव मांडून योगी सरकार मोदी सरकारच्या विरोधात जाणार का?”, असा प्रश्न ओवैसींनी उपस्थित केला होता.
१०० जागांवर एमआयएम निवडणूक लढणार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे मोठे नेते असल्याचं वक्तव्य करत त्यांनी दिलेलं आव्हान स्वीकारलं आहे. कोणत्याही परिस्थितीत २०२२ मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनू देणार नाही, असं वक्तव्य ओवेसी यांनी केलं होतं. तसेच, एमआयएम हा पक्ष उत्तर प्रदेशात १०० जागादेखील लढवणार आहे.