UP Election : ... तेव्हा लोकसंख्या नियंत्रण कायदा होईल, मुख्यमंत्री योगींनी स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 07:52 AM2021-09-22T07:52:13+5:302021-09-22T07:52:40+5:30
UP Election : एका वृत्तवाहिनीच्या मंथन 2021 या कार्यक्रमात योगींनी लोकसंख्या नियंत्रण करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.
लखनौ - उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर योगी सरकारकडून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यात येत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य उत्तर प्रदेश आहे. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी योगी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. योग्य वेळ येताच सरकार लोकसंख्या नियंत्रण कायदा संमत करणार असल्याचं योगींनी मंगळवारी बोलताना म्हटलं.
एका वृत्तवाहिनीच्या मंथन 2021 या कार्यक्रमात योगींनी लोकसंख्या नियंत्रण करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते, तुम्ही म्हणत होतात की, मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे, पण आता मंदिर निर्माणाचे काम सुरू झाले आहे. तसेच, जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 ही हटविण्यात आले. त्यामुळे, सध्या आमच्यासमोर माता-पिता मृत्यूदर नियंत्रित आणण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी, सरकारने व्यापक अभियानही सुरू केलं आहे. आमचं जे काम असतं ते ढोल वाजवून होतं. त्यामुळे, योग्य वेळ येताच लोकसंख्या नियंत्रण कायद्याबद्दलही आपणास माहिती दिली, जाईल, असे योगींनी सांगितले.
मी पुन्हा येईन, भाजपला 350 पेक्षा जास्त जागा
एका मुलाखतीत उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार येईल, असा विश्वास योगींनी व्यक्त केला. तसेच, मी पुन्हा येईन म्हणत मुख्यमंत्रीपदी आपणच विराजमान होणार असल्याचे त्यांनी म्हटलं. उत्तर प्रदेशच्या राजकारणात गेल्या 35 वर्षांत कुठलाही मुख्यमंत्री दुसऱ्यांदा निवडून आला नाही? असा प्रश्न मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उत्तर देताना योगींनी मै आऊंगा ना म्हणत मी पुन्हा येईन... असेच म्हटले आहे. तसेच, आम्ही रेकॉर्ड तोडण्यासाठीच आलो आहोत, माझा जो ट्रेंड सुरू आहे. त्यानुसार, भाजपला 350 पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत, असे म्हणत एकहाती सत्ता येणार असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी टाइम्स नाऊने म्हटले आहे.
कोरोनाच्या भुताला बाटलीत बंद केलं
कोरोना विषाणू विरोधात अतिशय नेटानं प्रतिकार केल्याचा दावा करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी कुशीनगर येथील जनसभेला संबोधित करताना एक आश्चर्यकारक विधान केलं आहे. "देशातील इतर राज्यांची सरकारं कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. पण आम्ही तर कोरोनाच्या भुताला बाटलीत बंद करुन टाकलं आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान केलेलं असलं तरी आम्ही केंद्र सरकारच्या साथीनं जनतेच्या गरजा पूर्ण करण्याचं काम केलं आहे", असं योगी आदित्यनाथ म्हणाले.