राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जूनला होणार निवडणूक; संजय राऊतांसह ६ जणांची मुदत संपली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 07:04 PM2022-05-12T19:04:36+5:302022-05-12T19:18:04+5:30
election to 57 seats of rajya sabha on june 10 : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील ६ जणांचा कार्यकाळ संपला आहे.
दिल्ली : राज्यसभेच्या (Rajya Sabha) रिक्त होत असलेल्या ५७ जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक ११, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधून प्रत्येकी ६, बिहारमधून ५ आणि राजस्थान आणि कर्नाटकमधून ४-४ जागांवर निवडणूक होणार आहे. २४ मे रोजी ५७ जागांसाठी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. तसेच, यासाठी नामांकनाची अंतिम तारीख ३१ मे असणार आहे. तर नामांकन छाननीची तारीख १ जून आणि नावे मागे घेण्याची अंतिम तारीख ३ जून असणार आहे. सर्व ५७ जागांसाठी १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. १० जून रोजी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होणार आहे, असे निवडणूक आयोगाने ( election commission) म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या जागांमध्ये सर्वाधिक ११ जागा उत्तर प्रदेशमधून रिक्त होत आहेत. यासोबतच महाराष्ट्रातील ६ , आंध्र प्रदेशात ४, तेलंगणात २ , छत्तीसगडमध्ये २, मध्य प्रदेशात ३, तामिळनाडूमध्ये ६, कर्नाटकात ४, ओडिशात ३, पंजाबमध्ये २, राजस्थानमध्ये ४, उत्तराखंडमध्ये १, बिहारमध्ये ५, झारखंडमध्ये २ आणि हरयाणात २ जागांवर मतदान होणार आहे.
दरम्यान, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील ६ जणांचा कार्यकाळ संपला आहे. तर राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, काँग्रेसच्या अंबिका सोनी, जेडीयूचे केसी त्यागी अशा दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. आज (गुरुवारी) राज्यसभेत या सदस्यांच्या निरोपाचा औपचारिक सोहळा पार पडणार होता. मात्र भाजपचे राज्यसभेचे खासदार प्रवीण राष्ट्रपाल यांच्या निधनाचे वृत्त राज्यसभेत येताच राज्यसभेने दिवंगत सदस्याला श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकूब केली.
संजय राऊतांसह महाराष्ट्रातून ६ जागा रिक्त
पियुष गोयल (भाजप)
पी चिदंबरम (काँग्रेस)
प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस)
विकास महात्मे (भाजप)
संजय राऊत ( शिवसेना)
विनय सहस्त्रबुद्धे (भाजप)